
मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नव्या नेतृत्वाला संधी मिळावी म्हणून मुंबईच्या रणजी संघाचं कर्णधारपद सोडलेय. मात्र तो मुंबईसाठी फलंदाज म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार असल्याचे आज जाहीर केले.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या बैठकीत कर्णधार अजिंक्य रहाणेसमोर नेतृत्व बदलाचा मुद्दा आला आणि त्याने नव्या हंगामासाठी नवा कर्णधार घडवण्याची वेळ आल्याचे सांगत कर्णधारपद सोडले. मुंबईसाठी कर्णधार म्हणून काम करण्याचा आणि विजेतेपद मिळवून देण्याचा मला मान मिळाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कर्णधार नसलो तरी खेळाडू म्हणून माझं योगदान कायम असेल, असं ‘एक्स’वर लिहीत अजिंक्यने आपल्या भावना व्यक्त केल्या.
रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2023-24 मध्ये आठ वर्षांचा दुष्काळ संपवत विक्रमी 42 वे रणजी विजेतेपद पटकावले होते, पण त्याच्या फलंदाजांचा फॉर्म ढासळला होता. त्याने 13 डावांत त्याने 17.83 च्या सरासरीने केवळ 214 धावा केल्या होत्या. पुढच्या हंगामात त्याने 467 धावा केल्या, पण यात सातत्याचा अभाव होता. त्यामुळे आता कर्णधारकी गमावल्यावर संघात स्थान टिकवणंही त्याच्यासाठी मोठं आव्हान असेल.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकीत माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, निवड समिती आणि क्रिकेट सुधारणा समिती सदस्य उपस्थित होते. त्यातच नव्या कर्णधाराचा विषय आला आणि निवड समितीने नव्या नेतृत्वाचा शोध घेण्याची वेळ आल्याचे रहाणेला सांगितले. तेव्हाच त्याने होकार दर्शवत आपल्या नेतृत्व राजीनाम्याची कल्पना दिली होती. आता रहाणेनंतर मुंबईचा कर्णधार कोण म्हणून श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावे समोर आली आहेत. तसेच उपकर्णधार शम्स मुलानी आणि सिद्धेश लाड या दोघांच्या नावांचाही विचार होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मुंबईच्या नव्या कर्णधाराची घोषणा एमसीएकडून होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.