
अनेक परदेशी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानच्या कारवाईवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हिंदुस्थानचे नुकसान झाल्याच्या बातम्याही त्यांनी दिल्या. पाकिस्ताननेही त्याला दुजोरा दिला. मात्र, परदेशी माध्यमांनी हिंदुस्थानचे नुकसान झाल्याचा एक फोटो दाखवावा. ते कोणताही फोटो किंवा उपग्रह प्रतिमा दाखवू शकले नाहीत. उलट हिंदुस्थानी लष्कराने 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून पाकिस्तान आणि परदेशी माध्यमांना आव्हान दिले.
संपूर्ण ऑपरेशनला 23 मिनिटे लागली. ते म्हणत राहिले की पाकिस्तानने हे आणि ते केले. पाकिस्तानने हिंदुस्थानचे एक लढाऊ विमान पाडले; परंतु असा एकही फोटो नव्हता, ज्यात हिंदुस्थानचे नुकसान झालेले दिसत होते, असे डोवाल यांनी नमूद केले. आयआयटी मद्रासच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. परदेशातील प्रसारमाध्यमांना जे वाटत होते ते त्यांनी लिहिले. परंतु, उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रतिमाच पाकिस्तानातील 10 हवाई तळावरील खऱ्या गोष्टी सांगत आहेत की, 10 मेच्या रात्री नेमके काय घडले.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा सार्थ अभिमान
तंत्रज्ञान आणि युद्ध यांच्यातील दुवा नेहमीच महत्त्वाचा असतो. आम्हाला ऑपरेशन सिंदूरचा आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभिमान आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा ऑपरेशन सिंदूरदरम्यान वापर करत दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातील नऊ तळांवर हल्ले चढवले. आम्ही अचूकरीत्या लक्ष्य भेदले. त्यांचे सर्व तळ उद्ध्वस्त केले, असेही ते म्हणाले.