
28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. आता VT-SSK या विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पोहोचला असून, त्याचे डिकोडिंग एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB)कडून केले जाणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित महत्त्वाचा डेटा आणि कॉकपिटमधील संभाषण नोंदवलेले असते. त्यामुळे अपघाताच्या तपासात या उपकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या प्रकरणावर नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विधित जाधव, वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक आणि केबिन क्रू सदस्य पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असताना बुधवारी सकाळी हे विमान कोसळले होते.
अपघातानंतर त्याच दिवशी AAIB दिल्ली येथील तीन अधिकारी आणि DGCA मुंबई प्रादेशिक कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. हे विमान दिल्लीस्थित नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर VSR Ventures Pvt Ltd कडून चालवले जात होते.
संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ATC लॉग्स, संभाषणांच्या नोंदी आणि ब्लॅक बॉक्ससह सर्व पुरावे AAIBच्या ताब्यात सीलबंद करण्यात आले आहेत. रविवारी रात्री तपास पथके परत दिल्लीला रवाना झाली.
रविवारी अपघातस्थळ साफ करण्यात आले असून जेटचे अवशेष पुढील तपासासाठी दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, बारामती विमानतळावरील उड्डाण सेवा अद्याप बंद असून येथे रेडबर्ड आणि कार्व्हर या दोन फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स कार्यरत आहेत.
अपघाताच्या वेळी ATC ऑपरेशन्स कार्व्हर एव्हिएशनकडून हाताळली जात होती. अपघाताच्या दिवशीची सर्व कागदपत्रे AAIBने जप्त केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथे अपघातग्रस्त झालेल्या Learjet 45 विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तपास वेगाने सुरू आहे. AAIB नियम 2025 मधील नियम 5 आणि 11 नुसार तपास प्रक्रिया राबवली जात असून, ठराविक कालमर्यादेत तपास पूर्ण करण्याची सरकारची बांधिलकी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.























































