
मुंबई महापालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याच्या अजित पवार गटाच्या निर्णयाला भाजपने ठाम विरोध केला असला तरीही भाजप आणि अजित पवार गटाची युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे आज स्पष्ट झाले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपबरोबर युतीबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी येत्या एक-दोन दिवसांत होणार असल्याचे सांगितले.
अजित पवार गटाच्या वतीने नवाब मलिक महापालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार असतील तर आम्ही त्यांच्याशी युतीबाबत चर्चा केली जाणार नाही, अशी भूमिका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी घेतली आहे. यावर बोलताना तटकरे म्हणाले, नवाब मलिक पक्षाचे नेते आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जी समिती नेमली आणि त्याचे ते प्रमुख आहेत याबाबत पक्षाची भूमिका आम्ही ठरवली आहे. महापालिका निवडणुकीतील युतीबाबतचा अंतिम निर्णय दोन दिवसांत होईल. बुधवारी पक्षाच्या आमदारांची बैठक होणार असून त्यात यासंदर्भातील आढावा घेतला जाईल.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसंदर्भात अजित पवार निर्णय घेणार असून त्यांनी मागील दोन दिवस पुण्यात उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. इथल्या युतीबाबत बुधवारी भूमिका ठरेल, असेही तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे इथे युती करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.



























































