
शेरी नाल्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याबरोबर सांगली नगरीत अद्यावत भाजी मंडई, रस्ते, गटारींचे प्रश्न सोडवू, अशा अनेक घोषणांची बरसात करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकत सांगलीकर जनतेला आशेचे गाजर दाखवले.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज मिरज शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. राज्यात सत्तेत एकत्र असणारे महायुतीतील घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी (अजित पवार गट) सांगली महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढत आहे. मिरजेतील किसान चौकात झालेल्या सभेत अजित पवार गटाचे उमेदवार तसेच आमदार इद्रिस नाईकवाडी, माजी खासदार संजयकाका पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
चार दिवसांपूर्वी भाजपाचा निवडणूक प्रचारचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगलीत झाला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने जनता विसरत नाही, तोपर्यंत उपमुख्यमंत्री पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक आश्वासनाची बरसात केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच त्यांच्या पक्षाचे उमेदवार अजीम काजी यांना कालच हद्दपार करण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना थांबवत पवार यांनी आपले भाषण आवरते घेतले.





























































