
बारामती विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माली (29) हिच्यावर आज शोकाकुल वातावरणात शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पिंकीच्या वडिलांनी व्हीएसआर या विमान कंपनीवर संताप व्यक्त केला. एवढी मोठी दुर्घटना घडली पण कंपनीकडून काहीच सहकार्य मिळाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर कंपनी व सरकारने आम्हाला साधा संपर्कदेखील साधला नाही, असे पिंकीचे पती सोमिलर सैनी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवास करत असलेल्या विमानाचा बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या अन्य चौघांचाही दुर्दैवी अंत झाला. त्यामध्ये प्रभादेवी येथे राहणारी पिंकी माली या प्लाईट अटेंडटचादेखील समावेश होता. शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर यांच्या सहकार्याने पिंकीचे पार्थिव पुण्याहून मुंबईला आणल्याचे पिंकीच्या पुटुंबीयांनी सांगितले. आधी कळवा येथील सासरच्या घरात काही वेळ मृतदेह ठेवण्यात आला. त्यानंतर प्रभादेवी येथील तिच्या आईवडिलांच्या घरी मृतदेह आणण्यात आला. पोटच्या मुलीचा मृतदेह घरी आणताच पिंकीची आई व बहिणीने टाहो पह्डला. परिसरातील नागरिक व इमारतीमधील रहिवाशांनादेखील अश्रू अनावर झाले.

























































