
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मागील सहा महिन्यांपासून चर्चा सुरू होती. शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
बारामतीला जी सर्व नेत्यांची बैठक झाली त्यासाठी आधी आम्ही विमानाने जाणार होतो. पण बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरेल असे विमान मिळाले नाही. 12 फेब्रुवारीला एकत्र करण्याबाबतची तारीख ठरली होती. दोन्ही पक्ष आधी एकत्रित करायचे, मग नंतर बाकीचे निर्णय घ्यायचे असे अजितदादांच्या मनात होते. या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे यांना आवर्जून घेतलं होतं, असे जयंत पाटील म्हणाले.
तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ यांना पूर्वकल्पना
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली होती. अजितदादा यांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि पक्षातील अन्य आमदारांनादेखील याची त्यांना कल्पना दिलेली आहे. हे त्यांनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं होतं. अजितदादांचं असं मत होतं की, मी जेव्हा निर्णय सांगतो तेव्हा तुम्ही चिंता करायची गरज नाही. हे सगळे माझे जे सहकारी आहेत ते मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील, असं दादांनी म्हटल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
आठ ते दहा वेळा बैठका झाल्या
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असा अजित पवारांचा आग्रह होता. त्यासाठी जवळपास आठ ते दहा वेळा बैठका झाल्या होत्या, बैठकीचे ठिकाण माझं घरच होतं. माझ्याकडे येऊन बऱयाच वेळेला ते बोलत होते. जे झालं ते सगळं विसरू आणि गेल्या दोन अडीच वर्षांचा कालखंड मागे टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करू ही त्यांची भूमिका होती, असे जयंत पाटील म्हणाले.





















































