
आखातामध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास इटावातील सैफई भागात येणाऱ्या नंदपूर गावातील एका गव्हाच्या शेतामध्ये आकाशातून एक वस्तू पडली. ड्रोन किंवा क्षेपणास्त्रासारख्या दिसणाऱ्या या वस्तूमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. नागरी उड्डाण विभागाच्या परवानगीने सुरू असलेल्या चाचणी उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा ड्रोन कोसळला, अशी माहिती प्रशासनाने दिली. यावरून आता उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे खासदार अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.
अखिलेश यादव यांनी इटावातील घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गव्हाच्या शेतामध्ये एक ड्रोनसारखी वस्तू पडल्याचे दिसत आहे. यावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इटावा जिल्ह्यातील सैफई परिसरातील नंदपूर गावात गव्हाच्या शेतात अचानक एक मोठा ड्रोन कोसळल्याने प्रचंड दहशत आणि गोंधळ निर्माण झाला. हा युद्धभूमीतून भरकटलेला एखादा क्षेपणास्त्र तर नाही ना, अशी भीती स्थानिक लोकांमध्ये पसरली होती, असे अखिलेश यादव म्हणाले.
जर हे कोणत्याही सरकारी चाचणीचा किंवा प्रयोगाचा भाग असेल, तर राज्यातील नागरिकांना आगाऊ सूचना देऊन सावध करायला हवे होते. जेव्हा हा ड्रोन यशस्वीपणे उडेल की नाही याचीच खात्री नव्हती, तेव्हा सामान्य लोकांच्या वस्तीत तो उडवण्याची जोखीम का पत्करली गेली? हा ड्रोन शेतात पडण्याऐवजी आसपासच्या एखाद्या वस्तीवर पडला असता, तर या अपघातात मोठी जीवित किंवा वित्तहानी होऊ शकली असती, असे अखिलेश यादव म्हणाले.
सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी आणि शेतकऱ्याच्या शेतात झालेले आर्थिक नुकसान व त्याला बसलेला मानसिक धक्का याचे मूल्यमापन करून त्या शेतकऱ्याला योग्य भरपाई द्यावी. तसेच भविष्यात अशा सर्व चाचण्या आणि प्रयोग केवळ निर्धारित निर्जन भागातच करण्यात यावेत, अशी मगाणीही त्यांनी केली.
युद्ध के वातावरण में अचानक किसी खेत में एक बड़े ड्रोन के, गेहूँ के खेत में गिरने से इटावा ज़िले के सैफई इलाके के नंदपुर गाँव में दहशत और अफ़रातफ़री मच गयी। लोगों ने सोचा कहीं कोई मिसाइल तो नहीं, जो युद्ध क्षेत्र से भटक कर यहाँ आ गिरी है।
अगर ये किसी सरकारी परीक्षण-टेस्ट या… pic.twitter.com/2tlICy92BK
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 4, 2026
भाजप सरकारच्या काळात कोणतीही चाचणी यशस्वी का होत नाही? सैफईची जनता म्हणत आहे की, जेव्हा भाजपवाल्यांना एक ड्रोन नीट उडवता येत नाहीये, तेव्हा ते सैफईच्या त्या धावपट्टीवरून विमान काय उडवणार? भाजपने राजकीय द्वेषापोटी या धावपट्टीलाही देखभालीशिवाय दुर्लक्षित सोडून दिले आहे, असा टोलाही अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

























































