
अकोला जिह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे भाजप नेत्यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. यावरून महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया आणि टीकेचा भडिमार सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती तत्त्वशून्य असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईचे संकेत देताच अकोटमध्ये एमआयएमशी केलेली युती अखेर तोडण्यात आली आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अकोट नगरपालिकेत 35 पैकी 33 जागांचे निकाल जाहीर झाले होते. यात भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या. मात्र बहुमतासाठी त्यांना 7 जागांची गरज होती. यासाठी भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला, ज्यात एमआयएम 5 जागा आणि इतर पक्षांना एकत्र घेऊन जिल्हाधिकाऱयांकडे नोंदणी केली. यावरून टीका होऊ लागताच भाजपच्या दबावानंतर एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी पाठिंबा काढून घेत भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न
अकोटमधील भाजपच्या भूमिकेमुळे हेच का भाजपचे हिंदुत्व? अशा संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून उमटू लागल्या. विरोधकांनीदेखील याच मुद्दय़ावरून भाजपला घेरल्याने महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपची चांगलीच काsंडी झाली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही युती तोडण्याचे आदेश देताच भाजपने स्थानिक नेत्यांना एमआयएमसोबतच्या युतीला जबाबदार ठरवत ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला आहे.



























































