
>> अक्षय शेलार
अँथनी जेसलनिक हा स्टँड-अप कॉमेडीमध्ये ब्लॅक कॉमेडी आणि नैतिक चिथावणी यांचं अद्वितीय मिश्रण सादर करतो. त्याची कला सर्वांसाठी खचितच नाही. काहींसाठी ती अपमानकारक, आक्षेपार्ह आणि अस्वस्थ करणारी ठरते. पण ज्यांना विनोदातून सीमारेषा ढकलून टाकण्याचं आकर्षण आहे, त्यांच्यासाठी जेसलनिक हा एक विलक्षण अनुभव ठरतो.
स्टँ ड-अप कॉमेडी म्हटलं की, बहुतेक वेळा ऊबदार वातावरण, हलकीफुलकी निरीक्षणे किंवा स्वतवर केलेली थट्टा आठवते. मात्र जेसलनिकने ही रूढ चौकट नुसती मोडीतच काढली नाही, तर तिची थट्टा उडवत स्वतची एक स्वतंत्र शैली तयार केली. ज्याला आपण डार्क ह्युमर किंवा ब्लॅक कॉमेडी म्हणतो त्याची पराकाष्ठा. मृत्यू, आपत्ती, धर्म, वैयक्तिक नाती, गुन्हेगारी, हिंसा अशा अनेकविध संवेदनशील नि वर्ज्य विषयांवर तो निर्भीडपणे, अत्यंत थंड, कोरडय़ा भावनेने विनोद तयार करतो. त्यामुळे त्याची कॉमेडी पाहताना प्रेक्षक एकीकडे हसतात आणि दुसरीकडे ‘आपण यावर कसे काय हसू शकतो,’ असे वाटून किंचित अपराधीपणाची, अस्वस्थतेची जाणीव त्यांना टोचते.
जेसलनिकची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची डिलिव्हरी. त्याच्या सादरीकरणात जवळजवळ भावनारहित चेहरा, थंड आवाज आणि अचूक ठिकाणी घेतलेले पॉज हे घटक अविभाज्य असतात. प्रत्येक पंचलाइन तो इतक्या गंभीरतेने मांडतो की, विनोदाऐवजी प्रथम ती एक कटाक्षपूर्ण टिप्पणी वाटते. आणि मग अचानक पंचलाइनचा संदर्भ लागताच हशा फुटतो. या शैलीतून तो प्रेक्षकांवर साधत असलेला परिणाम ‘कॅलिग्युला’ (2013) किंवा ‘थॉट्स अँड प्रेयर्स’ (2015) या स्पेशल्समध्ये ठळकपणे दिसतो.
त्याच्या कॉमेडीत शॉक व्हॅल्यू हा एक महत्त्वाचा घटक आहे. शॉक व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्याला प्रेक्षकांना भावनिक-नैतिकदृष्टय़ा आव्हान देऊन, त्यांना संभ्रमात टाकायला आवडतं. जेसलनिक मुद्दाम प्रेक्षकांच्या अपेक्षा उलथवून टाकतो. साध्या, रोजच्या प्रसंगासारखा सेट-अप देऊन अचानक त्या कथेला अनपेक्षित गडद वळणावर नेतो. उदाहरणार्थ, एखाद्या छोटय़ा कौटुंबिक किस्स्याची सुरुवात करून तो पंचलाइनमध्ये मृत्यू, आत्महत्या किंवा लैंगिक शोषण, इत्यादींपर्यंत जाऊन पोचतो. प्रेक्षकांना सुरुवातीला जे वाटलं होतं त्याचं उलट चित्र रंगवणं, हाही त्याच्या विनोदाचा महत्त्वाचा भाग. जेसलनिकच्या विनोदाचा आणखी एक ठळक पैलू म्हणजे त्याची स्वजाणीव. तो प्रेक्षकांना वारंवार जाणवून देतो की, “मला ठाऊक आहे, तुम्हाला हा विनोद चुकीचा, संवेदनशील किंवा आक्षेपार्ह वाटू शकतो; पण तरीही मी तो सांगणार आहे.” ही भूमिका त्याला इतर कॉमेडियन्सपासून वेगळं बनवते. त्याच्या ‘द जेसलनिक ऑफेन्सिव’ या टीव्ही शोमध्ये ही शैली अधिक स्पष्टपणे दिसली. नैसर्गिक आपत्ती किंवा हत्यांसारख्या संवेदनशील घटनांवर केलेले त्याचे ‘टू सून’ प्रकारातील विनोद वादग्रस्त ठरले. पण त्यातून त्याच्या कॉमेडीचं सारही दिसलं.
काही वेळा जेसलनिकचे विनोद ‘पंचिंग डाऊन’ स्वरूपाचे असतात किंवा भासतात. संवेदनशील घटनांवर किंवा पीडितांवर केलेली थट्टा असंवेदनशीलतेची पातळी ओलांडते, असा आक्षेप त्यावर सर्रास घेतला जातो. मात्र, जेसलनिकचा दावा वेगळा आहे. त्याच्या मते तो प्रेक्षकांच्या नैतिक अपेक्षांवर हल्ला करतो. त्यामुळे त्याचे विनोद प्रत्यक्षात समाजाच्या नैतिक चौकटींवर प्रश्न उपस्थित करतात… असा हा चतुर, परंतु रोचक युक्तिवाद.
त्याच्या विनोदात चपखल लेखन आणि दिशाभूल करणे हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. प्रत्येक जोक तो शल्यक्रियेच्या अचूकतेने रचतो, घट्ट बांधतो. सेट-अप सरळ, साधा आणि जवळजवळ अनुमान करता येण्याजोगा असतो, पण पंचलाइन जवळपास नेहमीच अपेक्षेपेक्षा वेगळ्या दिशेला घेऊन जातो. ही दिशाभूल तो इतक्या सफाईदार पद्धतीने वापरतो की प्रेक्षक नकळत त्या जाळ्यात अडकतात. त्यामुळेच जेसलनिकची तुलना बऱयाचदा इतर डार्क कॉमेडियन्सबरोबर केली जाते. उदा. बिल हिक्स किंवा डग स्टॅनहोप. मात्र, जेसलनिकची शैली अधिक क्लिनिकल, अधिक नियंत्रित आहे.
त्याच्या चेहऱयावरील निर्विकार भाव, स्टेजवरील संथ हालचाल आणि थंड पद्धतीची डिलिव्हरी त्याला या सगळ्यांपासून वेगळं बनवते. जिथे इतर कॉमेडियन सामाजिक भाष्य करतात, तिथे जेसलनिक समाजाला ‘धक्का’ देऊन विचार करायला लावतो. तो मुद्दाम प्रेक्षकांच्या मर्यादा तपासतो. ‘इथपर्यंत हसू आलं, पण पुढचं ऐकून तुम्ही खजील व्हाल’ असं अधोरेखित करतो. प्रेक्षक त्याच्यासोबत हसताना स्वतच्याच नैतिक चौकटींचं उल्लंघन करतात, आणि हीच अस्वस्थता त्याच्या विनोदाची खरी ताकद ठरते. अँथनी जेसलनिकबद्दल आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे त्याचं स्टेजवरील व्यक्तिमत्त्व. तो स्वतला थंड, उदासीन आणि आत्मकेंद्री व्यक्ती म्हणून सादर करतो. ही प्रतिमा पूर्णपणे विचारपूर्वक घडवलेली आहे. ‘फायर इन द मॅटर्निटी वॉर्ड’ (2019) या नेटफ्लिक्स स्पेशलमध्ये हे सर्व पैलू प्रकर्षाने जाणवतात. मृत्यू, पालकत्व, बाळाचा जन्म, आजार अशा विषयांवर केलेले त्याचे विनोद सामान्य कॉमेडियन टाळतील असे आहेत. मात्र, जेसलनिक त्यातून विनोद रचतो आणि कोणत्याही भावनिक आवरणाचा आधार न घेता जाणीवपूर्वक थंडगार शैलीने तो प्रेक्षकांवर अधिक तीव्र परिणाम साधतो. सुजाण प्रेक्षकांना या स्पेशलमधील काही विनोदांमध्ये ‘सररीयल’ दृश्य प्रतिमाही सहजपणे जाणवतील.
अँथनी जेसलनिक हा स्टँड-अप कॉमेडीमध्ये ब्लॅक कॉमेडी आणि नैतिक चिथावणी यांचं अद्वितीय मिश्रण सादर करतो. त्याची कला सर्वांसाठी खचितच नाही. काहींसाठी ती अपमानकारक, आक्षेपार्ह आणि अस्वस्थ करणारी ठरते. पण ज्यांना विनोदातून सीमारेषा ढकलून टाकण्याचं आकर्षण आहे, त्यांच्यासाठी जेसलनिक हा एक विलक्षण अनुभव ठरतो. त्याचा प्रत्येक शो हा केवळ मनोरंजनपर कार्यक्रम नसतो, तर तो समाजाच्या नैतिक रचनेला आरसा दाखवतो.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)