
अलिबाग बस आगारासमोर दोन एसटी बसमध्ये चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. मात्र या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मृत तरुणाचे नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत तीन तास वाहतूक रोखून धरली. यावेळी काही संतप्त नागरिकांनी तुफान दगडफेक करत काही एसटी बसेस फोडल्या. त्यामुळे यामुळे प्रवाशांसह विद्यार्थी तसेच इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलांना जबरदस्त फटका बसला. दरम्यान, पोलिसांनी जमावाची समजूत काढत आगारासमोरील रस्ता मोकळा केला. त्यानंतर लालपरीची वाहतूक सुरळीत झाली.
अलिबाग एसटी बस आगारासमोर वर्दळीच्या 11.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एका चारचाकी वाहनचालकाने ब्रेक दाबल्याने कारच्या पाठी असलेल्या एसटी बसचालकाने बस थांबविली. यानंतर बसच्या पाठी असलेल्या जयदीप बना या मोटारसायकलरस्वाराने आपली मोटारसायकल एसटी बसच्या पाठीमागे थांबवली. मात्र याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसची धडक जयदीप बना याच्या मोटारसायकलला बसली. या धडकेमुळे जयदीप हा दोन एसटी बसमध्ये चिरडला गेला. हा अपघात एवढा भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.
जयदीप बना याचा अपघाती मृत्यू झाल्याची खबर वरसोली गावात समजताच बना याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी अलिबाग एसटी आगार येथे धाव घेतली.
अपघाताचे चित्र पाहताच या सर्वांचा संताप अनावर झाला. त्यांनी अपघातग्रस्त एसटी बस व आगारात दगडफेक केली. तसेच आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी समजावूनही जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
कर्मचाऱ्यांनी काढला पळ
संतप्त जमावाने अपघातग्रस्त एसटी बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या. यावेळी काही जणांनी आगारात दगड फेकले. संतप्त जमाव पाहून बस आगारातील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. जमाव आगार परिसरातून गेल्यानंतर कर्मचारी पुन्हा आगारात आले व त्यानंतर एसटी बससेवा सुरू करण्यात आली.
विद्यार्थ्यांची फरफट
शाळा सुटल्यानंतर वाहतूक सुरू होण्याची विद्यार्थ्यांना ताटकळत वाट पाहावी लागली. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून अलिबाग शहरातील शाळांमध्ये परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वाहतूक सुरू होण्याची वाट पाहावी लागली.