
राजस्थान-बंगळुरू यांच्यात होणारा सामना कोण जिंकणार यापेक्षा एकच प्रश्न सर्वांच्या मनात वादळासारखा घोंगावतोय, वैभव सूर्यवंशी आज काय करणार? कोणत्या गोलंदाजाला लक्ष्य करणार? आणि किती चेंडूत आपली अर्धशतकी आतषबाजी साजरी करणार? अवघ्या हिंदुस्थानात वैभव सूर्यवंशीची फलंदाजी सर्वांची पहिली पसंत ठरू लागलीय. त्यामुळे साऱ्यांनाच वैभव शोची उत्सुकता लागलीय.
राजस्थानच्या या धडाकेबाज सलामीवीराने यंदाच्या स्पर्धेत पहिल्याच चेंडूपासून हल्ला चढवण्याची सवय लावली आहे. गोलंदाज सेट होण्याआधीच त्यांच्यावर तुटून पडणारा वैभव प्रतिस्पर्ध्यांच्या योजनाच उद्ध्वस्त करत आहे. मागील सामन्यात पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराला षटकार ठोकत आपल्यासाठी सारेच गोलंदाज एकसमान असल्याचे दाखवून दिले. या फटकेबाजीनंतर वैभवच्या प्रत्येक हालचालीवर हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
यशस्वी जैसवालसोबतची त्याची जोडी म्हणजे विरोधकांसाठी डोकेदुखी ठरलीय. एकीकडे सातत्यपूर्ण धावा करणारा जैसवाल आणि दुसरीकडे आक्रमणाची परिसीमा गाठणारा वैभव. या जोडीमुळे राजस्थानला झंझावाती सुरुवात मिळते.
बंगळुरूविरुद्धही सर्वांचे लक्ष वैभववरच खिळले आहे. तो पुन्हा सुरुवातीपासून धडाका लावणार का? की गोलंदाज त्याला रोखण्याची रणनीती आखतील? वेगवान मारा असो वा फिरकी, वैभव कोणालाही न जुमानता फटकेबाजी करतो हे स्पष्ट झाले आहे.
गोलंदाजांची भिंत
राजस्थानची गोलंदाजीही तितकीच धारदार आहे. नव्या चेंडूवर वेगवान माऱयाबरोबर फिरकीत रवी बिश्नोई आघाडीवर आहे. त्याला रवींद्र जाडेजा आणि संदीप शर्मा यांची प्रभावी साथ लाभत आहे, तर नांद्रे बर्गर आपल्या स्विंगने फलंदाजांना अडचणीत टाकतो.
बंगळुरूचा संतुलित डाव
बंगळुरूचा संघही तितकाच धोकादायक आहे. विराट कोहली अधिक आक्रमक रूपात दिसत असून फाफ डु प्लेसिसही लयीत परतला आहे. रजत पाटीदार सातत्यपूर्ण धावा करत मधल्या फळीची जबाबदारी सांभाळत आहे, तर टिम डेव्हिडसह इतर फलंदाज शेवटी जोरदार फटकेबाजी करतात.
जेकब डफीने वेगवान माऱयात प्रभाव टाकला असून कृणाल पंडय़ा आणि सुयश शर्मा मधल्या षटकांत धावांवर लगाम लावत आहेत. त्यामुळे हा सामना केवळ फलंदाजी नव्हे, तर रणनीती, संयम आणि आक्रमकतेची खरी परीक्षा ठरणार आहे.




























































