
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या हत्या प्रकरणाशी असलेला संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि वाल्मीक कराडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
शिष्टमंडळात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे सहभागी होते. सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांना एक निवेदनही देण्यात आले. संतोष देशमुख यांची अमानुष छळ आणि निर्घृण हत्या हे बीडमधील ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेचे एक उदाहरण आहे. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणासह देशमुख यांचे अपहरण, छळ आणि निर्घृण हत्येमुळे जिल्हाभर अशांतता पसरली आहे आणि राज्यभरात सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे. वाल्मीक कराड आणि गँगच्या कारवायांबाबत बीड पोलिसांना वारंवार तक्रार देऊनही पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरले असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
राज्यपालांचा सकारात्मक प्रतिसाद
या प्रकरणाची पक्षपातीपणे हाताळणी आणि आरोपींना राज्य सरकारचा कथित पाठिंबा यामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे. राज्यपालांनी याप्रकरणी त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली. त्याला राज्यपालांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जाते.