
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरचा तडाखा देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानने केलेले हल्ले हिंदुस्थानी लष्कराने परतवून लावले. अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले आणि शस्त्रसंधीची विनंती केली. मात्र, ट्रम्प यांनी आपल्या मध्यस्थीमुळे शस्त्रसंधी झाल्याचे म्हटले तसेच अचानक घूमजाव केले. आता सर्वपक्षीय खासदार विविध देशांत जाऊन हिंदुस्थानची भूमिका मांडणार असून केंद्र सरकारकडून याप्रकरणी शिष्टमंडळेही तयार करण्यात आली आहेत.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती हिंदुस्थानी लष्कराकडून देण्यात आली. हिंदुस्थानी लढाई पाकिस्तानी सैन्यासोबत नसून दहशतवाद्यांविरोधात आहे हा संदेश जगभरात पोहोचावा यासाठी केंद्र सरकार येत्या काही दिवसांत जगभरातील विविध देशांत सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांशी संपर्क साधला असून विविध देशांत पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.