
सेवा ज्येष्ठता डावलून दिलेली पदोन्नती आणि पगार, छत्रपती शाहू सांस्कृतिक भवन निविदा, अंतर्गत रस्ते यांसह विविध भ्रष्ट कारभारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून धारेवर धरल्यानंतर अखेर या सर्व आरोपांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक किरण पाटील यांना बुधवारी (दि. 1) दिले.
जिल्हा विशेष लेखापरीक्षकांना चौकशी अहवाल तातडीने देण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने समितीच्या भ्रष्ट कारभारावरून चौकशीसह सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. त्यामुळे ही चौकशी कधी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.
बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार व सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय सहनिबंधक महेश कदम यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. समितीचा भ्रष्ट कारभार निदर्शनास आणून देत, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेत, विभागीय सहनिबंधक कदम यांनी समितीमध्ये झालेल्या या कारभाराच्या चौकशीची सूचना जिल्हा उपनिबंधकांना केली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक करे यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत. बाजार समितीचे सध्या लेखापरीक्षण सुरू असून, त्यामध्ये तक्रारीची चौकशी करून लेखापरीक्षण अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
सेवाज्येष्ठता डावळून दिलेली पदोन्नती तसे आदेश देण्यापूर्वीच संबंधित कर्मचाऱयांना दिलेला पगार, शाहू सांस्कृतिक भवनाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही संबंधित ठेकेदारास काम न दिल्यासह, दुकानगाळे हस्तांतर, रिकाम्या जागेत टपरी लावणे, प्लॉट हस्तांतरातील भ्रष्टाचार तसेच साडेतीन कोटी रुपये रकमेच्या रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम आदींची चौकशी होणार आहे.
—



























































