
बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. मस्साजोगच्या सरपंचाची हत्या होऊन 22 ते 23 दिवस उलटून गेल्यानंतर यामागचे आरोपी पकडले जातायत. यावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सुदर्शन या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मात्र तब्बल 22-23 दिवस गुंगारा देत फिरणारे हे आरोपी घटनस्थळापासून केवळ 250 किमी अंतरावर पुण्यात सापडतात. यांना कोणी आश्रय दिला, सुरक्षा कोणी दिली? असा संतप्त सवाल अंबादास दानवे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे. त्यामुळे ज्याने या आरोपींना आश्रय दिला त्यांची नावे आता तातडीने समोर यायला हवीत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी पकडले गेले आहेत. तब्बल २२-२३ दिवस गुंगारा देत फिरणारे हे आरोपी घटनस्थळापासून केवळ २५० किमी अंतरावर पुण्यात सापडतात. यांना कोणी आश्रय दिला, सुरक्षा कोणी दिली, ही नावे आता तातडीने समोर यायला हवीत. #santoshdeshmukhcase
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 4, 2025
आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे.