गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणे हाच भाजपचा खरा अजेंडा आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

बदलापूर येथील चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना भाजपने थेट स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’कडून आरोपीला थेट राजकीय पद देण्यात आले असून, त्यामुळेच घटनेनंतर तब्बल 44 दिवसांनी त्याला अटक का झाली, हे आता जनतेला समजले असेल, असा टोला त्यांनी लगावला.

दानवे यांनी भाजपच्या राजकारणावर निशाणा साधताना म्हटले आहे की, आधी एमआयएम, त्यानंतर काँग्रेससोबत युती आणि आता थेट आरोपींना राजाश्रय देणे, हा भाजपच्या मनमानी कारभाराचा ‘तिसरा एपिसोड’ आहे. ‘भयमुक्त महाराष्ट्र’ अशा घोषणा केवळ बाजारगप्पा असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणे हाच भाजपचा खरा अजेंडा आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.