
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरू असताना विधानसभेच्या सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला. हा व्हिडीओ म्हणजे राज्य सरकारची शेतकर्यांप्रती असलेली असंवेदनशीलता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्याना घरी बसवावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई येथे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात दानवे यांनी विविध प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला घाम फोडला. याबद्दल माहिती देण्यासाठी क्रांतिचौक येथील दानवे यांच्या ‘मातृभूमी प्रतिष्ठान’ या संपर्क कार्यालयात अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडीओवरही प्रतिक्रिया दिली.
कोकाटे यांच्या व्हिडीओबाबत पत्रकारांनी दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, शेतकर्यांच्याप्रती राज्य सरकार किती असंवदेनशील आहे, हे यावरून दिसून येते. सभागृहात शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना कृषिमंत्री रमी खेळण्यात गुंग होते.
हे वागणं बरं नव्हं…कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ #rohitpawar pic.twitter.com/P5bPTYMFTA
— Saamana Online (@SaamanaOnline) July 20, 2025
ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांचा पिकविमा, कर्जमाफी, बोगस बियाणे, पावसाची ओढ, खतांच्या वाढत्या किमती, शेतकर्यांची होत असलेली लूट या विषयावर दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मात्र कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळण्यात मग्न असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असले तरी राज्य सरकारची मजबुरी आहे. अशा मंत्र्यांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या कृषिमंत्र्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय; शेतकऱ्यांनो यांना धडा शिकवा! वडेट्टीवार यांचा हल्लाबोल