
‘शिवसेना’ या चार अक्षरांमध्येच स्वाभिमानाचे स्फूल्लिंग दडलेले आहे. पलीकडे बेइमानी आहे, फसवाफसवी आहे. स्वाभिमानाची चतकोर महत्त्वाची की बेइमानीची, हे तुम्हीच ठरवा. शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तर ती महाराष्ट्राच्या मनामनात पेटलेली धगधगती मशाल आहे, ज्वलंत हिंदुत्वाचा तो रसरसता अंगार आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
नाशिक येथे आयोजित शिवसेना निर्धार शिबिरात ‘संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी’ या विषयावर ते बोलत होते. भारतीय आणि हिंदू परंपरेत आत्मा शब्दाचा अर्थ संस्पृतीशी जोडलेला आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातून शरीररूपाने गेले असले तरीही संस्पृतीच्या परंपरेनुसार त्यांचा आत्मा अजूनही आपल्यात आहे. 1966 ते 2019पर्यंत शिवसेना राज्यात काम करत असताना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रस्थापित सत्ता होती. अनेक वर्षं शिवसेनेने संघर्षात काढून साखरसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या विरोधात लढाई लढून राज्यात सत्तेचे परिवर्तन करत 1995 साली सत्ता खेचून आणली होती. आगामी काळातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने संघटनात्मक कामकाज करत राज्याची सत्ता खेचून आणणार, असा आशावाद दानवे यांनी व्यक्त केला. पक्षाची सत्ता येवो किंवा न येवो, महाराष्ट्रात स्वाभिमानाचा विचार रुजवणे शिवसेनेचे काम आहे.