
उत्तर प्रदेशचे योगी सरकार माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे समोर आले आहे. मानवतेला अक्षरशः लाज आणणारी घटना हमीरपूर येथे घडली. यमुना नदीवरील पुलाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असे असले तरी एका आमदाराची गाडी सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांनी सोडली. मात्र त्या वेळी रुग्णवाहिकेतून आईचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या मुलाला मात्र अडविण्यात आले. त्यामुळे मुलाला रुग्णवाहिकेच्या चालकासह आईचा मृतदेह स्ट्रेचरवरून एक किलोमीटरपर्यंत पायी चालत न्यावा लागला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून योगी आणि मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. आईच्या मृत्यूमुळे आधीच खचलेल्या मुलाने पोलिसांच्या अक्षरशः पाया पडून विनवणी केली. त्यांना त्याची अडचण सांगितली. तरीही पोलिसांनी त्याचे अजिबात ऐकले नाही. अखेर या मुलाला स्ट्रेचरवरून आईचा मृतदेह पलीकडच्या बाजूस न्यावा लागला. कानपूर-सागर महामार्ग एनएच-4वर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला पायी चालत गेल्यानंतर तिथून ऑटोरिक्षातून पार्थिव नेण्यात आले.
नेमके काय घडले…
कानपूर-सागर महामार्गावरील यमुना नदीवर असलेला पूल नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करण्यात आले. या कामामुळे दोन दिवसांसाठी येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र शनिवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास आमदार मनोज प्रजापती येथून जात असल्यामुळे पोलिसांनी बॅरीकेट्स हटवले. तीन तासांनी तेथे बिंदा नावाचा तरुण आईचे पार्थिव रुग्णवाहिकेद्वारे घेऊन कानपूरहून येत होता. मात्र पोलिसांनी रुग्णवाहिकेला परवानगी नाकारली.