
हिंदुस्थानकडून पहलगामचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. त्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानकडून सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये होणारा गोळीबार अधिक तीव्र करण्यात आला आहे. या घटनांमध्ये आज सीमाभागातील 10 नागरिकांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. त्यामुळे याभागातील खबरदारीचे उपाय अधिक सक्षम करण्यावर जोर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सीमाभागातील जिल्ह्यांच्या उपायुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली.
या बैठकीची माहिती देणारे एक सरकारी निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सध्याच्या घडामोडी आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळील जिल्ह्यांमध्ये, परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्याची तयारी यांचा आढावा घेण्यात आला’, असे सरकारी निवेदनात म्हटलं आहे.
जम्मू आणि कश्मीरमधील विषेश बैठकीसाठी मुख्य सचिव अटल दुल्लू, कश्मीर आणि जम्मूचे विभागीय आयुक्त, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आयुक्त सचिव, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण सचिव आणि जम्मू, पूंछ, राजौरी, कठुआ, सांबा, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यांचे उपायुक्त उपस्थित होते.
यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी प्रत्येक सीमावर्ती जिल्ह्यांना 5 कोटी रुपये आणि इतर जिल्ह्यांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा आकस्मिक निधी तात्काळ जारी करण्याचे निर्देश दिल्याचे कळते. या निधीमुळे जिल्हाधिकाऱ्यांना उद्भवणाऱ्या आणि पुरेशा संसाधनांची उपलब्धता आवश्यक असलेल्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी सज्ज राहता येईल असे सांगण्यात आले आहे. त्यांनी ‘या निधीच्या वितरणात सीमावर्ती जिल्ह्यांना विशेष प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत’, अशीही माहिती देण्यात आली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे याबैठकीत अधोरेखित केले. मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागात जनतेसाठी निवारा आणि बंकर उपलब्ध करून देणे, स्थलांतर योजना तयार ठेवणे आणि अन्न पुरवठ्याचा पुरेसा साठा असल्याची खात्री करणे यावर जोर दिला. तसेच या संदर्भात पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांकडून यावेळी करण्यात आले.