अमेरिकेच्या सैन्यप्रमुखांना हटवले, काश पटेल आणि तुलसी गॅबार्ड यांचीही गच्छंती होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धाला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही अमेरिकेच्या हाती अपयश आले आहे. इराणने कडवा प्रतिकार करत अमेरिकेला घाम पह्डला आहे. त्यामुळे दररोज नवे दावे करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धातील अपयशाचे खापर त्यांच्या इतर सहकाऱयांवर फोडायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम त्यांनी अ‍ॅटर्नी जनरल पॅम बॉन्डी यांना ‘एपस्टीन फाईल्स’ योग्य प्रकारे न हाताळल्यावरून हटवले. आता थेट लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना निवृत्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यात पुढचा क्रमांक एफबीआयचे प्रमुख काश पटेल आणि गुप्तचर खात्याच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांचा असू शकतो.  

इराण युद्धामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता घटली आहे. इराणचा कडवा प्रतिकार अमेरिकेला महिनाभरानंतरही मोडून काढता आलेला नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी अचानक प्रशासनिक पातळीवर बदल करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम होमलँड सुरक्षा प्रमुख क्रिस्टी नोएम यांना हटवले. त्यानंतर पॅम बॉन्डी यांना हटवले. आता सैन्यप्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ निवृत्तीचे आदेश दिले. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी त्यांना तसेच आदेश दिले आहेत. जॉर्ज यांचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता. आता त्यांच्या जागी ख्रिस्तोफर ला नेव्ह यांना ही जबाबदारी दिली आहे.

सरकरी पद, पैशांचा दुरुपयोग केल्यामुळे काश पटेल रडारवर

इराणशी संबंधित असलेल्या हॅकर्सनी काश पटेल यांचे वैयक्तिक ई मेल खाते हॅक करून पटेल यांची अनेक छायाचित्रे आणि कागदपत्रे इंटरनेटवर सार्वजनिक केली. याशिवाय पटेल यांनी प्रेयसी अ‍ॅलेक्सिस विल्किंस हिला स्वॅट कमांडो सुरक्षा दिली. त्यामुळे पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पटेल यांच्या विरोधात एफबीआयचे काही निलंबित एजंट न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे काश पटेल यांची विकेट लवकरच पडू शकते.

तुलसी गॅबार्ड यांच्याशी युद्धावरून मतभेद

इराण युद्धावरून गॅबार्ड आणि ट्रम्प यांच्यात मतभेद उघड झाले आहेत. ट्रम्प यांनी इराणच्या युरेनियम क्षमतेवर हल्ल्याचे समर्थन केले असताना, गॅबार्ड यांनी सिनेटमध्ये सांगितले की, इराणने आपली अण्वस्त्र क्षमता पुन्हा विकसित केलेली नाही. ट्रम्प यांच्या इराण युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा देणारे अधिकारी जो पेंट यांची गॅबार्ड यांची पाठराखण केली होती. त्यामुळे गॅबार्ड यांच्यावर गच्छंतीची तलवार आहे.