
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्हिसा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील एकूण 12 देशांसाठी हे नियम असणार आहेत. या देशातील नागरिकांना व्हिसा मिळवण्यासाठी 5 हजार ते 15 हजार डॉलरपर्यंत रक्कम मोजावी लागणार आहे. हे नियम 2 एप्रिल 2026 पासून लागू केले जाणार आहेत. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, बी1 बिझनेस-बी2 टूरिस्ट व्हिसा लागू केले जाणार आहेत.
या नियमानुसार, व्हिसा मुलाखतीवेळी अर्जदारांना 5 हजार डॉलर, 10 हजार डॉलर किंवा 15 हजार डॉलरपर्यंत रक्कम जमा करावी लागू शकते. कन्सुलर अधिकाऱयांनी सांगितल्यानंतर अर्जदारांना ही रक्कम जमा करावी लागणार आहे. जर वेळेत अर्जदारांनी अमेरिका सोडल्यास अर्जदारांना ही रक्कम परत केली जाईल. जर वेळेत अमेरिका सोडली नाही तर ही रक्कम जप्त केली जाऊ शकते. गेल्या वर्षी ट्रम्प प्रशासनाने इमिग्रेशन सिस्टममध्ये अनेक बदल केले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, व्हिसा प्रोग्रामचा दुरुपयोग होत होता. अर्जदारांची तपासणी पुरेसी केली जात नव्हती. त्यामुळे सरकारने मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. सोशल मीडिया व्हेरिफिकेशन वाढवले आहे. व्हिसा फी आणि अन्य अटींमध्ये बदल केले आहेत. हे सर्व करण्याचा उद्देश म्हणजे अवैध पद्धतीने सुरू असलेल्या व्यवहारांना रोखणे आणि व्हिसा सिस्टमला अधिक पारदर्शी करणे हा आहे.
कोणत्या देशांचा समावेश
नव्या यादीनुसार, ज्या 12 देशांना हा नवीन नियम लागू केला जाणार आहे, त्या देशांमध्ये कंबोडिया, इथियोपिया, जॉर्जिया, ग्रेनाडा, लेसोथो, मॉरिशस, मंगोलिया, मोजाम्बिक, निकारागुआ, पापुआ न्यू गिनी, सेशेल्स आणि टयूनीशिया या देशांचा समावेश आहे. याआधी 2025 मध्ये 37 अन्य देशांवरही हाच नियम लागू करण्यात आला होता. यात क्युबा, बुरुंडी, नामिबिया, तंजानिया आणि जाम्बिया या देशांचा समावेश होता.

























































