
अमेरिकेचा टेनिसपटू टेलर फ्रिट्झने सहजपणे विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनची लढतीदरम्यान पाठीची उसन भरल्याने त्याने सामना अर्धवट सोडल्याने फ्रिट्झला अवघ्या 41 मिनिटांत विजयी घोषित करण्यात आले. थॉम्पसनने पाठीच्या दुखापतीसह या स्पर्धेत दुहेरीतही खेळला होता. मात्र, आजच्या एकेरीतील चौथ्या फेरीतील लढतीदरम्यान त्याचा हा त्रास आणखी बळावला.
फ्रिट्झविरुद्धच्या सामन्यात तो सुरुवातीपासूनच अडखळत होता आणि अखेर 6-1, 3-0 अशा पिछाडीवर असतानाच त्याला माघार घ्यावी लागली. अशा अर्धवट सामन्यात विजय मिळविणे मनाला समाधान देत नाही, अशी प्रतिक्रिया फ्रिट्झने लढतीनंतर दिली. सध्या फ्रिट्झ सर्वाधिक एसेस (79) मारणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीवर आहे. आता त्याची उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या करेन खाचानोव्हशी लढत होणार आहे. 17 व्या मानांकित रशियाच्या कॅरेन खाचानोव्ह याने चौथ्या फेरीत पोलंडच्या कामिल मॅजक्रझाकचा 6-4, 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.