
पश्चिम आशियामध्ये इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने शनिवारी मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने इराणचे माजी कमांडर कासिम सुलेमानी यांची भाची हमीदेह सुलेमानी अफशार हिचे ग्रीन कार्ड रद्द केले आहे. कासिम सुलेमानी यांचा जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
सध्या हमीदेह सुलेमानी अफशार आणि तिची मुलगी अमेरिकन फेडरल एजन्सीच्या ताब्यात आहेत. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी त्यांचे ग्रीन कार्ड रद्द केल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे. रुबियो यांनी म्हटले आहे की, या दोघी आतापर्यंत अमेरिकेत ग्रीन कार्ड धारक म्हणून वास्तव्यास होत्या. हमीदेह अफशार ही इराणच्या राजवटीची कट्टर समर्थक राहिली असून तिने अमेरिकेवरील हल्ल्यांचा आनंद साजरा केला होता आणि अमेरिकेचा उल्लेख ग्रेट सॅटन (सैतान) असा केला होता.
मार्को रुबियो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हमीदेह सुलेमानी अफशार आणि तिची मुलगी अमेरिकेत ग्रीन कार्डवर ऐशोआरामात राहत होत्या, परंतु आता त्यांची कायदेशीर स्थिती संपवण्यात आली आहे. सध्या त्या अमेरिकेतून डिपॉर्टेशन प्रक्रियेअंतर्गत आयसीईच्या (ICE) ताब्यात आहेत. ट्रम्प प्रशासन आपल्या देशाला अशा परदेशी नागरिकांचे ठिकाण बनू देणार नाही, जे अमेरिकाविरोधी दहशतवादी राजवटीचे समर्थन करतात. यासोबतच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अफशारच्या पतीलाही अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

























































