क्रिकेट निवृत्तायण सुरूच, फिरकीवीर अमित मिश्राचीही निवृत्ती

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये निवृत्तायण थांबण्याची चिन्हे नाहीत. गेल्याच आठवडय़ात स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आता हिंदुस्थानचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रानेही क्रिकेटच्या सर्व प्रकाराला रामराम ठोकला आहे. मिश्राने त्याच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, क्रिकेटप्रेमींचे आभार मानले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून हिंदुस्थानच्या क्रिकेट विश्वात निवृत्तीचा धडाका सुरू असून, एकापाठोपाठ एक दिग्गज खेळाडू क्रिकेटच्या खेळपट्टीला निरोप देत आहेत. सुरुवातीला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 सह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी अश्विनने निवृत्त झाला. त्यातच आज अमित मिश्राने 25 वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर क्रिकेटला अलविदा केले आहे.

आपल्या फिरकीच्या तालावर भल्याभल्या फलंदाजांना नाचवणाऱ्या मिश्राने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली आहे. मिश्रा गेल्या काही काळापासून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपड होता. मात्र त्याला संधी मिळाली नाही. गेल्या काही दिवसांपासून मिश्रा आयपीएलपासूनही दूर गेला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचा विचार केला जात नव्हता. त्यामुळे मिश्राने आज अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने हिंदुस्थानसाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मिश्राने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही आपल्या फिरकीची जादू दाखवली.

‘क्रिकेटमधील ही 25 वर्षे माझ्यासाठी खूप संस्मरणीय राहिली आहेत. मी बीसीसीआय, प्रशासन, हरयाणा क्रिकेट संघटना, सपोर्ट स्टाफ, माझे सहकारी खेळाडू आणि कुटुंब, क्रिकेटप्रेमींचे मनापासून आभार मानतो. चाहत्यांचे अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो, ज्यामुळे माझा प्रवास अधिक खास झाला. क्रिकेटने मला असंख्य आठवणी आणि धडे दिले आहेत. प्रत्येक क्षण ही एक आठवण आहे जी मी आयुष्यभर जपून ठेवेन’, असं अमित मिश्राने निवृत्ती जाहीर करताना केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

अमित मिश्राने 25 वर्षांची क्रिकेट कारकीर्द अनुभवली. मिश्राने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरंच नाव कमावलं. त्याने 152 प्रथम श्रेणी सामन्यात 535 विकेट घेतल्या.