आसाममधील ७ जिल्ह्यांत ६४ लाख घुसखोर; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा भरसभेत दावा

Amit Shah Warns of 64 Lakh Infiltrators in 7 Assam Districts

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील धेमाजी येथे एका जाहीर सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी संबोधित केले. या सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी आसाममधील ७ जिल्ह्यांत ६४ लाख घुसखोर असल्याची माहिती दिली आहे. २०१६ पूर्वी राज्यात असलेल्या काँग्रेसच्या सरकारांना निशाणा बनवत असताना त्यांनी हा दावा केला.

काँग्रेसच्या २० वर्षांच्या सत्ताकाळात आसाममधील जनसांख्यिकीय रचना बदलली असल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मोठा दावा केला. आसाममधील सात जिल्ह्यांमध्ये तब्बल ६४ लाख घुसखोरांचे वर्चस्व निर्माण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

अमित शहा म्हणाले की, ‘धुब्री, बारपेटा, दर्रांग, मोरीगाव, बोन्गाईगाव, नगाव आणि गोलपारा या सात जिल्ह्यांमध्ये घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काँग्रेसच्या २० वर्षांच्या सत्ताकाळात या सात जिल्ह्यांची परिस्थिती बदलली, जिथे आधी घुसखोर नव्हते, तिथे आता ६४ लाख लोकसंख्या त्यांची आहे. ही घुसखोरी थांबवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देणे गरजेचे आहे.’ विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांपासून आसाममध्ये भाजपचेच सरकार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसमधूनच भाजपमध्ये आले आहेत. सरमा हे काँग्रेसमध्ये असताना भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते.

जनतेला आवाहन

घुसखोरी रोखण्यासाठी जनतेने शस्त्रे उचलण्याची गरज नाही, असे सांगत शहा म्हणाले की, ‘हिमंता बिस्वा सरमा यांचे सरकार हे काम समर्थपणे करेल, तुम्ही काळजी करू नका. मात्र, घुसखोरीला पूर्णपणे आळा घालायचा असेल, तर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला आपला पाठिंबा द्या आणि भाजपचे सरकार निवडून आणा.’ महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून हिमंता बिस्वा सरमा हेच आसामचे मुख्यमंत्री आहेत.

मोदी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना शहा यांनी सांगितले की, आसाममधील सलग दोन भाजप सरकारांनी सुमारे १.२६ लाख एकर जमीन घुसखोरांच्या अतिक्रमणातून मुक्त केल्याचा दावा केला आहे.

निवडणुकीचे बिगुल

आसाममधील विधानसभेच्या १२६ जागांसाठी मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. २०१६ पासून सलग दोनवेळा सत्तेत असलेल्या भाजपने तिसऱ्यांदा सत्तेत राहण्यासाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेस आपली गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे.

Amit Shah Warns of 64 Lakh Infiltrators in 7 Assam Districts | Assam Election 2026

Home Minister Amit Shah claims 64 lakh infiltrators dominate 7 districts in Assam. Addressing a rally in Dhemaji, he stated that only a BJP government can stop illegal infiltration. Read the latest updates on Assam Assembly polls.