
पहलगाम घटनेनंतर राजधानी दिल्ली अस्वस्थ असताना देशाचे ‘फोडाफोडी’ फेम गृहमंत्री अमित शहा हे किरकोळ पक्षप्रवेशासाठी नांदेडात आले होते. कोरड्या योजनांचा पाढा वाचल्यानंतर अमित शहा यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे ‘आदर्श’ मेजवानीवर ताव मारला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खास अशोक चव्हाणांच्या आग्रहावरून नांदेडात आले होते. अमित शहा यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची हवा यानिमित्ताने करण्यात आली. मात्र अमित शहा यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम आणि चव्हाणांचे नातलग डी. पी. सावंत वगळता कोणीही मोठा नेता भाजपच्या गळाला लागला नाही.
शंखनाद कसला, शहांनी वाजवले तुणतुणे!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शंखनाद करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना अमित शहा यांनी शंखनाद तर केलाच नाही, पण जुन्याच योजनांचे तुणतुणे वाजवले. पुढील वर्षापर्यंत देशात एकही नक्षलवादी राहणार नाही, असेही ते म्हणाले. यापुढे देशाकडे वाकड्या नजरेने पाहणारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी लोणकढी थापही त्यांनी मारली. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही नव्या हिंदुस्थानची ओळख आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मोहिमेसाठी मोदींचे कौतूकच केले असते, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही भाषण झाले.
अस्मानी संकटात भाजप नेत्यांची ‘आदर्श’ मेजवाणी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वळचणीला गेलेले खासदार अशोक चव्हाण यांनी अमित शहांसाठी खास मेजवानीचे आयोजन केले होते. सगळा महाराष्ट्र पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. मुंबईसह अनेक शहरांचे पावसाने बेहाल केले आहेत. पुण्यात ढगफुटीने शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. जेजुरीच्या मंदिरात गुडघाभर पाणी साचले. पण या अस्मानी संकटाचे कोणतेही सोयरसुतक न बाळगता भाजपच्या नेत्यांनी ‘आदर्श’ मेजवानीवर मस्त ताव मारला.