
‘एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तो अमित शहा यांनी निर्माण केलेला गट आहे. शिंदेंना वाटत असेल दिल्लीतले दोन नेते आपल्या पाठीशी आहेत, पण ते कोणाचेच नाहीत. त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागेपुढे पाहिले नाही तिथे शिंदे कोण? शिंदे गटाचा कोथळा अमित शहाच काढतील,’ असा हल्ला आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चढवला.
संजय राऊत महिनाभरानंतर आज माध्यमांसमोर आले. भांडुप येथील ‘मैत्री’ निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपल्या तब्येतीबाबत माहिती देतानाच राजकीय प्रश्नांवर त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.
कुठे कुठे लक्ष्मीदर्शन झाले आयोगाने तपासावे
निवडणुका उद्या आहेत आणि आज लक्ष्मीदर्शन होणार असे शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितले आहे. आता कुठे कुठे लक्ष्मीदर्शन झाले याची माहिती आयोगाने घ्यावी. 10 हजार आणि 15 हजार एका मतामागे दिलेत. एकेका नगर परिषदेसाठी पंधरा ते वीस कोटींचे बजेट आहे. तू मोठा की मी मोठा अशी सत्तेतल्या तीन पक्षांत स्पर्धा लागली आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत पैशांचा खेळ एवढा कधी झाला नव्हता, असे संजय राऊत म्हणाले.
तब्येतीत सुधारणा
‘माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांची टीम चांगलं काम करत आहे. लवकरच मी पूर्ण बरा होईन,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे माझ्या तब्येतीवर बारीक लक्ष आहे, प्रकृतीबाबत ते विचारपूस करत असतात, असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांना बरोबर घेणे आवश्यक
भाजप मुंबईचा शत्रू आहे. मुंबई अदानींच्या घशात घातली जाते आहे. ते थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांना बरोबर घेणे आवश्यक आहे. राज ठाकरे सोबत आल्याने भाजपचा पराभव होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शिंदेंचे लवकरच 35 आमदार फुटणार
एकनाथ शिंदेंचे 35 आमदार पह्डण्याचे काम सुरू झाले आहे आणि पह्डापह्डीसाठी रवींद्र चव्हाण यांची खास नेमणूक करण्यात आली आहे, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला.































































