
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा येत्या शनिवारी रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अमित शहा हे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरचा पाहुणचार घेणार आहेत. रायगड जिह्याच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री आदिती तटकरे इच्छुक आहेत. या दौऱ्यासाठी भाजपने शिंदे गटाला आमंत्रित केले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजता त्यांचे पुण्यात आगमन होईल. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतील. नंतर 11 वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते वंदन करतील. नंतर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी 2 वाजता ते सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. दुपारचे जेवण ते तटकरेंच्या घरी जेवणार आहेत.
अतिउत्तम! आता ईडी आणि एसीबी बंद करून टाका – दमानिया
केंद्रीय गृहमंत्री दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 72 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत, आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार? अतिउत्तम! ईडी आणि एसीबी आता गुंडाळून टाका, असा टोला लगावत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
अंजली दमानिया यांनी कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लेम नाही, असे शिर्षक देत सोशल मीडियावर एक पोस्ट करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. कितीही मोठा घोटाळा करा, 72 हजार कोटीचा सिंचन घोटाळा आठवतो का? त्याचे पुढे काय झाले? काहीच नाही ना? कारण आपले थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती. त्यात रायगडचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांचे नाव जाहीर केले होते. त्यामुळे शिंदे गटाचे भरत गोगावले हे नाराज झाले. त्यांच्या समर्थकांनी रायगडमध्ये आंदोलनही केले. या नाराजी नाट्यानंतर पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. या निर्णयाचा चेंडू आता अमित शहा यांच्या कोर्टात पोहोचला आहे. अशातच शहा हे सुनील तटकरे यांचा पाहुणचार घेणार आहेत. या दौऱ्यासाठी शिंदे गटाला आमंत्रण दिलेले नाही. या भेटीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे गटात खास करून भरत गोगावले यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे.