अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल संशयाचे काहूर कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संशयाचे उठलेले काहूर अजूनही कायम आहे. तो अपघात नसून घातपात होता असे दावे करतानाच अपघाताची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. आता विमानात सुसाईड बॉम्ब असावा, असा संशय व्यक्त केला गेला आहे.

विमानात सुसाईड बॉम्ब

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीची सुरुवातीपासूनच मागणी करणारे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांना संपवण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बचा वापर करण्यात आला असावा, असे म्हटले आहे. व्हीएसआर पंपनीने गेल्या डिसेंबर महिन्यात आपल्या प्रत्येक वैमानिकाचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. दादांच्या विमानाचा पायलट अचानक बदलला गेला. जो नवा पायलट होता त्याला संमोहित केले गेले होते का? त्याला या 50 कोटींचे आमिष दाखवण्यात आले होते का? असा सवाल करतानाच, अनेक ठिकाणी हिप्नोटाईज करून सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो, असे मिटकरी म्हणाले. पायलटला संमोहित केले गेल्यामुळेच त्याने मेडेचा कॉल दिला नसावा. कसाबलाही संमोहित करून मुंबईवर हल्ला करायला पाठवले होते, राजीव गांधींची हत्या घडवण्यासाठीही तसाच प्रयत्न झाला होता, असे मिटकरी म्हणाले.

विमानात दादांसोबत ‘पीए’ का नव्हता?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या अपघातावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘‘नेहमी सावलीसारखे सोबत असणारे अजित पवारांचे पीए त्या दिवशी विमानात का नव्हते? विमानात फक्त सुरक्षा रक्षकच का होते?’’ असा सवाल त्यांनी केला आहे. याप्रकरणी योग्य दिशेने तपास व्हावा म्हणून संसदेत आवाज उठवणार असल्याचा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे. अजितदादा आमच्या बीड जिह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी ते राज्याचे मोठे नेतृत्व होते. त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्री आणि गृह मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही सोनवणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले असून त्यावर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा माझ्यासमोरच झाली होती, अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण व्हावे यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते, असा दावा आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादीमधील नेत्यांनी केला होता. त्यात अभिनेते सयाजी शिंदे यांची आज भर पडली. राष्ट्रवादीचे एकत्रिकरण हे अजितदादांचे स्वप्न होते, आमच्या समोरच त्यासंदर्भात चर्चा झाली होती, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.

सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे अशी भावना एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. सर्वधर्म समभाव घेऊन, गरीब-श्रीमंत न पाहता सर्वांना पुढे घेऊन जायचे अशी अजित पवार यांची इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न आपण सगळ्यांनी पुढे न्यायला पाहिजे, असे सयाजी शिंदे म्हणाले.