शैक्षणिक – गौरवशाली परंपरा

>> अनघा सावंत

‘ज्या शाळेमुळे खुला झाला

आमच्या ज्ञानाचा स्वर्ग,

ज्या शाळेने दाखविला

आम्हाला शिक्षणाचा मार्ग,

त्या शाळेची होऊ दे आता सर्वत्र भरभराट,

उज्ज्वल भविष्याची होऊ दे या

अमृत महोत्सवी नवी पहाट!’

या भावना आहेत माहीम येथील ‘सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटी’ या शाळेतील विद्यार्थ्यांच्या. गेली सात दशके उत्तम विद्यार्थी घडविणाऱया आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱया या शाळेने जून 2024 मध्ये अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

हिंदुस्थान देश प्रजासत्ताक झाला त्याच वर्षी म्हणजे 1950 मध्ये ‘सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटी’ या शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. बालवाडीतील केवळ बारा मुलांसह माहीम पश्चिम भागात सारस्वत कॉलनी या गृहसंकुलात मुक्ता कोटणीस यांनी या शिक्षण कार्याचा श्रीगणेशा केला. संमिश्र आर्थिक, सामाजिक स्तरातील मुलांना किंबहुना वंचित समाजातील मुलामुलींना उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साकार करण्याचे बळ मिळावे हा मुख्य उद्देश यामागे होता.

शाळेच्या इतिहासाची ही 75 वर्षे उलगडताना संस्थेचे विश्वस्त प्रतिनिधी म्हणाले, “केवळ बालवाडीने हा शिक्षण प्रवास सुरू झाला. पुढे मुले उत्तीर्ण होत गेली तसे शाळेचे वर्ग वाढत गेले. 1961 साली 17 मुलांचा पहिला वर्ग मॅट्रिकच्या परीक्षेला बसला. सुरुवातीला या गृहसंकुलाच्या सभागृहात, मग काही वर्ग संस्थापिका मुक्ता कोटणीस यांच्या घरात, असे करता करता 1956 मध्ये शाळा सध्याच्या वास्तूत आली. मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमही सुरू झाले. विद्यार्थी संख्या वाढत गेली तसे मजले चढत गेले आणि 2007 पासून शाळेची पाच मजली इमारत दिमाखात उभी राहिली. जेथे आज 2700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.’’

शैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रमांमध्ये शाळेला मिळणारे यश लक्षणीय आहे. शाळेचा दहावीचा निकाल 97-99 टक्क्यांपर्यंत लागतोच. शिवाय महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा, होमी भाभा बाल वैज्ञानिक पुरस्कार, नॅशनल टॅलेंट सर्च स्पर्धा, इंग्लिश आणि गणित ऑलिम्पियाड अशा अनेक परीक्षांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. अध्यापनाबरोबरच सांस्कृतिक परंपरा आणि सण यांचा वारसाही शाळेने जोपासला आहे. शाळेच्या जडणघडणीत शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका अहिल्या कामत यांचा मोलाचा वाटा असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.

या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीत शाळेचेच माजी विद्यार्थी निःस्वार्थीपणे कार्यरत आहेत. 75 वर्षांपूर्वीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले प्रेमाचे, सलोख्याचे संबंध पाहता विद्यार्थ्यांच्या शाळेबरोबरच्या ऋणानुबंधांची याहून मोठी पावती काय असू शकते? प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक वर्ग, डिजिटल शिक्षण सुविधा याचबरोबर मुंबईतील शाळांमध्ये दुर्मीळ असलेली एक सुविधा या शाळेकडे आहे, स्वतचे पटांगण! या पटांगणावर होणाऱया विनामूल्य क्रीडा शिक्षणामुळे हिंद करंडक, राणी लक्ष्मीबाई सन्मानचिन्ह अनेकदा मिळवून शाळेने नावलौकिक मिळवत क्रीडा क्षेत्राला असंख्य चमचमते तारे दिले आहेत. हिंदुस्थानी जिम्नॅस्टिक संघाचे नेतृत्व करणारी पूजा सुर्वे, राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्ट खेळाडू पूनम सुर्वे, जुईली प्रभू, छत्रपती पुरस्कार विजेते सुधीर मस्के, मंदार म्हात्रे, एकलव्य पुरस्कार प्राप्त प्रवीण सिंदकर, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खो-खोमध्ये बाजी मारणारे श्रेयस राऊळ, पारस खडक, जान्हवी मांडवकर, गोपाळ कट्टा, अमन दुलगज, आदित्य गुप्ता, अदिती खेंम्भवी, मार्दवी! तसेच हिंदुस्थानी नौसेना विशेष दलात मार्कोस कमांडो म्हणून कार्यरत असलेला आदित्य तेरवनकर, चांद्रयान मोहिमेतील चिन्मय शिरोडकर, मत्स्य संशोधन क्षेत्रातील संशोधक डॉ. पूजा विंदे असे माजी विद्यार्थी हा शाळेचा अभिमान आहे.

सर्वोत्कृष्ट शाळा (2019-20), स्वच्छ शाळा  (2022) तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’ अशा पुरस्कारांनी शाळेला गौरवले गेले आहे. आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक अशा मानचिन्हांनी इथल्या शिक्षकवृंदाला सन्मानित केले गेले आहे, ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे. शाळेची शतकपूर्तीकडे वाटचाल होत असताना माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा शाळेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे विश्वस्तांनी आवर्जून सांगितले.

शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 27 जुलै 2024 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत चित्रकला, गायन, वत्तृत्व, निबंध लेखन, खो-खो, क्रिकेट इ. आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता

वेबसाईट ः smhsmahim.edu.in

ई-मेलः [email protected]

[email protected]