
राज्य कल्याण मंडळ योजनेंतर्गत सक्तीची नोंदणी आणि अवाजवी शुल्क आकारणीला पश्चिम उपनगरातील रिक्षाचालक-मालकांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर (आरटीओ) रिक्षा चालक-मालकांनी बहुसंख्येने एकत्र येत निदर्शने केली. रिक्षाचालक-मालकांच्या विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.
रिक्षाचालक-मालक संघटनांनी कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी शुल्कासह विविध निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने ऑटो रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन केले. मात्र मंडळाची स्थापना करताना आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. सध्या रिक्षाचालकांना राज्य कल्याण मंडळ योजनेंतर्गत 500 रुपयांचे नोंदणी शुल्क आणि 300 रुपयांचे वार्षिक शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. त्याविरोधात रिक्षाचालक-मालकांच्या संघटनांनी आरटीओ कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
रिक्षाचालकांवर आर्थिक बोजा वाढला आहे. त्यातच प्रशासन नोंदणी शुल्कासाठी सक्ती करीत आहे. तसेच इतर जाचक अटी लादल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या उपनगरांसह राज्यभरातील रिक्षाचालक-मालक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
























































