
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात ज्वलनशील रसायनांचा वापर केला जात असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. अचानक लागलेल्या आगीत अनेक मजूर अडकले, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ही आग रायवरम मंडळातील कोमारिपालम गावातील लक्ष्मी गणपती फायरवर्क्स युनिटमध्ये लागली. स्थानिक लोकांनी कारखान्यातून धूर निघताना पाहिला तेव्हा त्यांनी त्वरित अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
घटनेनंतर पोलीस, महसूल अधिकारी आणि आपत्कालीन कर्मचारी मदत व बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी राजामहेंद्रवरम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारखान्यात सुरक्षा उपाययोजनांचा अभाव किंवा चुकीच्या पद्धतीने रसायनांची हाताळणी केल्यामुळेहा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.