
चाक रेतीत अडकल्याने आंब्याचा ट्रक पिकअपवर उलटलून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठवण्यात आले.
आंध्र प्रदेशातील अन्नामय्या जिल्ह्यातील रेड्डीचेरुवुजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. सदर आंब्याचा ट्रक राजमपेट मंडलातील थल्लापका गावाहून कोडूरला चालला होता. यावेळी मजूर आंब्याच्या पेट्यांवर बसले होते. यादरम्यान रेड्डीपल्ली तलावाच्या बांधावर चढताना ट्रकचे चाक रेतीत अडकले. यामुळे ट्रक पिकअपवर उलटला आणि भीषण अपघात घडला. ट्रक उलटल्याने पेटीवर बसलेले मजूर खाली पडले. यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 12 जखमी झाले.
जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कडप्पा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी पुल्लमपेट पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.