
भक्ती पार्क ते मैसूर कॉलनीदरम्यान मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. तब्बल साडेतीन तास प्रवाशांना गाडीत गुदमरल्याचा त्रास झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुलमधील मोनोरेलच्या मुख्य कार्यालयावर धडक दिली. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मोनोरेलच्या प्रशासनाला जाब विचारला. तसेच भविष्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
मोनोरेलच्या कार्यपद्धतीतील त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने सह महानगर आयुक्त आस्तिककुमार पांडे, ऑपरेशन डायरेक्टर नामदेव रबाडे यांची भेट घेतली. मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्यास धोक्याची सूचना मिळावी म्हणून अलार्म व्यवस्था नसणे, प्रवाशांना बंद गाडीत अस्वस्थ वाटू नये म्हणून गाडीत तांत्रिक आणि सुरक्षा कर्मचारी तैनात नसणे, प्रवाशांची सुटका करण्यासाठी स्वतःची यांत्रिक व्यवस्था नसणे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. तसेच भविष्यात दुर्घटना घडू नये म्हणून विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या. त्यात जिजामाता नगर रस्त्यावर असलेल्या अर्धवर्तुळाकार मार्गाची पुनर्रचना, स्थानकाखाली सुरक्षा रक्षक नेमणे, प्रवाशांच्या सुटकेसाठी आपत्कालीन यांत्रिक व्यवस्था तसेच प्रवाशांच्या सूचनांचाही समावेश होता. शिष्टमंडळात विभागप्रमुख प्रमोद शिंदे, उपसचिव पवीण महाले, दिनेश बोभाटे, माजी नगरसेवक श्रीकांत शेटये, युवासेना सहसचिव जसप्रीत वढेरा, उपविभागप्रमुख प्रशांत म्हात्रे, शाखाप्रमुख सचिन भोसले, उपविभाग अधिकारी रुपेश मढवी उपस्थित होते.





























































