
राज्य शासनाने न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावा अन्यथा मला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिला.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्री असताना तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर काही आरोप केले होते. यासंदर्भात माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांची चौकशी समिती गठीत केली. अकरा महिने चौकशी करून त्यांनी 1400 पानांचा चौकशी अहवाल राज्य सरकारला दोन वर्षांपूर्वी सादर केला होता. हा अहवाल विधानसभेत पटलावर ठेवावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेकदा पत्र देऊन केली आहे. सरकारने हा अहवाल जाहीर केला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे देशमुख म्हणाले.
अनेक वृत्तपत्रांत ‘अनिल देशमुख यांना क्लीन चिट’ दिल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या आहेत. मात्र मिंधे सरकार यासंदर्भातील माहिती जाणीवपूर्वक जनतेसमोर आणण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणात इतर पक्षातून लोक येत आहेत. सरसकट कुणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांची पडताळणी करूनच राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये नगरसेवकांपासून सुरू झालेले इनकमिंग आता आमदारांपर्यंत जाणार आहे. भाजपचेही आमदार यात असून अजितदादा गटातील व इतरही पक्षातील आमदार आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.