धुळ्यात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मतचोरी, 45 हजार जणांनी केले बोगस मतदान; अनिल गोटे यांचा आरोप

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 45 हजार बोगस मतदारांनी मतदान केले. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत सत्ताधारी भाजपने मतांची चोरी केली आहे. यासाठी संगणकतज्ञांना दोन कोटी रुपये दिले. तसेच बीएलओंना बोगस मतदान करून घेण्यासाठी प्रत्येकी 20 हजार आगाऊ रक्कम दिल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 44 हजार 453 मतदार होते. त्यापैकी 1 लाख 86 हजार 884 मतदारांनी मतदान केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र धुळ्यात मतदारांचा आकडा 22 टक्क्यांनी वाढविण्यात आला. विधानसभा निवडणुकीनंतरच्या दहा महिन्यांत चौकशी केली तेव्हा धक्कादायक प्रकार पुढे आल्याचे गोटे यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल नाही

धुळे शहर मतदारसंघात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मतचोरी करता यावी म्हणून जोशी नावाच्या संगणकतज्ञाला 2 नोव्हेंबरला रात्री 9ला वाशीजवळ 2 कोटी रुपये देण्यात आले. धुळे विधानसभा निवडणुकीत मतचोरी करता यावी म्हणून त्या वेळी जिल्हाधिकारी पदावर जितेंद्र पापळकर यांना आणण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत नेऊन तक्रार केली होती. त्याची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. आता यासंदर्भातील पुरावे घेऊन न्यायालयातच जाणार असल्याचे गोटे म्हणाले.