
>> अनिल हर्डीकर
लोकशाहीर वामन कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून सर्वदूरपर्यंत पोहोचवले. वामनदादांना त्यांच्या ‘आतला’ कवी गवसण्याआधी एका अनामिकाची भेट त्यांना घडवणारी ठरली. न्यूनतेची जाणीव होत कवीचा जन्म होण्यासाठी घडलेली भेट आयुष्याचं देणं बहाल करणारी ठरली.
पूर्ण नाव – वामन तबाजी कर्डक.
जन्म दिनांक – 15 आागस्ट, 1922
जन्मस्थळ -देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
सईबाई तबाजी कर्डक या माऊलीच्या पोटी जन्माला आलेला हा सुपुत्र पुढे वामनदादा कर्डक म्हणून त्याला लौकिक प्राप्त झाला. मराठी शाहीर कवी आणि आंबेडकरी चळवळीतला तो आघाडीचा कार्यकर्ता होता. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. कर्डकांनी डा. आंबेडकरांवर दहा हजारांहून अधिक गाणी लिहिली आणि गायली आहेत.
लोकशाहीर वामन कर्डक यांनी डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घराघरात, खेडोपाडय़ात, वाडी तांड्यात पोहोचवण्याचे काम केले. गौतम बुद्ध, फुले, आंबेडकर यांचे विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जा केंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या अखेरपर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला. 15 मे 2004 रोजी वयाच्या 81व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परभणी जिह्याच्या गंगाखेड तालुक्यातील गावाच्या शेतशिवारात राणीसावरगाव-गंगाखेड रस्त्यालगत त्यांची समाधी आहे.
त्यांचे प्रारंभिक जीवन मोठे कष्टप्रद होते. वामनला आईवडील, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा परिवार होता. घरी 18 एकर शेती होती. धान्य घरात येई, पण हंगाम संपला की आई डोंगरात, रानात जाऊन लाकडे गोळा करत असे. त्याची मोळी बांधून ते जळतण सिन्नरच्या बाजारात विकत असे. वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकत असत. सर्वांनी काबाडकष्ट केल्यानंतरही आषाढ-श्रावणात कुटुंबाची आबाळ व्हायची. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी तर कधी फक्त भाकरीवरच भागवावे लागत असे. वामनने लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, अशी कामे केली. जगण्याचा आणखी एक मार्ग मुंबईच्या दिशेनेसुद्धा जातो. वामनराव मुंबईला आले. शिवडीला गिरणीत कामाला लागले. मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम केले. चिक्की विकली, आईसफ्रूट विकले, खडी फोडली व टाटा आाईल मिलमध्ये नोकरी पण केली.
वयाच्या 19व्या वर्षी वामनचे अनुसूया नावाच्या मुलीशी लग्न झाले. त्यांना मीरा नावाची मुलगी होती. कौटुंबिक सुख वामनच्या नशिबात नव्हते. अनुसूया वामनला सोडून गेली आणि त्यानंतर मीराही निधन पावली.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या माणसाने आपले आयुष्य संपवले असते, पण कधीही शाळेत न गेलेल्या, अक्षरांशी ओळख नसलेल्या वामनच्या आयुष्याला वळण देणारी एक घटना घडली. कुणा अनामिक व्यक्तीने त्याला कागदावर लिहिलेला पत्ता रस्त्यात दाखवून ‘जरा पत्ता सांगता का?’ असे विचारले. त्याक्षणी वामनला आपल्याला एक अक्षरही वाचता येत नाही याचे अतीव दुःख झाले आणि त्याने शिकण्याचा, अक्षरओळख करून घेण्याचा निश्चय केला.
…आणि त्यांना अक्षरओळख करून देणारा गुरूही भेटला. एकदा लिहा-वाचायला येऊ लागल्यावर त्यांनी वाचण्याचा सपाटा सुरू केला. मराठीसोबत हिंदीमधले साहित्यही ते वाचू लागले. चित्रपट कथाकार, अभिनेता होण्याची इच्छा त्यांच्या मनात बळावली. त्यासाठी अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये ते गेले. अखेरीस मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्स्ट्रा म्हणून त्यांना प्रवेश मिळाला. कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओमध्ये ते कामाला जात असत व काम नसेल तेव्हा बागेत तासन्तास बसून राहात असत. 1943च्या काळात आंबेडकरी चळवळ वेगाने सर्वत्र जोर धरू लागली होती. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात असत. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगावमध्ये त्याच सुमारास त्यांनी बाबासाहेबांना पाहिले आणि ते त्यांच्या विचाराने भारावून गेले.
1943 साली राणीबागेत बसले असताना वामनदादांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन केले आणि ते 3 मे 1943 रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना ते गाणे खूप आवडले. त्यांनी टाळ्या वाजवल्या. वामनदादांना त्यांच्या ‘आतला’ कवी गवसला. चाळीसगाव, मनमाड, टिळकनगर इथल्या बाबासाहेबांच्या व्याख्यानावेळी वामनदादांनी आपल्या कविता, गाणी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
त्यांच्या काव्यसंग्रहाची नावे ‘वाटचाल’, ‘मोहळ’ अशी आहेत. वामनदादांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान केवळ जागेच्या मर्यादेमुळे लिहिता येत नाही. वामनदादा कर्डक यांच्यावर एक हिंदीत माहितीपटदेखील निघाला. त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या कार्यावर काही पुस्तकेही लिहिली गेली आहेत. एका कवीचे जीवनगाणं, आंबेडकरी प्रतिभेचा महाकवी, आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक, आंबेडकरवादी महागीतकार वामन कर्डक… अशी त्या पुस्तकांची नावे आहेत.
वामनदादांचे सगळे कर्तृत्व आपल्यासमोर मांडताना मला त्यातली एक गोष्ट अचंबित करते ती म्हणजे एका अनामिकाने त्यांना पत्ता विचारला आणि निरक्षर वामनला त्यांच्यातील न्यूनतेची जाणीव झाली… आणि त्यानंतर एका कवीचा जन्म झाला.