
>> अंजली महाजन
शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसूनही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा दिव्यांग लक्ष्मीचा प्रवास.
अनेकदा आपण एखाद्या छोटय़ाशा अडचणीमुळे संपूर्ण आयुष्यालाच दोष देऊ लागतो. परिस्थितीमुळे निराश होतो, स्वतच्या जीवनाबद्दल हताशा मनात घर करते. प्रत्यक्षात मात्र आपण ठरवले तर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. पण क्षणभर विचार करा, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन्ही हातच नसतील तर ती आनंदाने, समाधानाने सामान्य आयुष्य जगू शकेल का? तिच्या मनात जिद्द तरी निर्माण होईल का? बहुतेकांना याचे उत्तर नकारार्थी वाटेल. तरीही काही जण अशा अवस्थेतही आयुष्याबद्दल तक्रार न करता, प्रामाणिकपणे जगतात आणि इतरांच्या मदतीसाठी उभे राहतात. ही कथा आहे अशाच एका महिलेची, जी शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसूनही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे.
लक्ष्मी कुमारी हे त्यांचे नाव. जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या लक्ष्मी दोन्ही हातांचा वापर करू शकत नाहीत. मात्र हे अपंगत्व त्यांच्या जीवनाला मर्यादा घालू शकले नाही. झारखंडमधील बेडो परिसरातील रहिवासी असलेल्या लक्ष्मीने पायांनी लिहित शिक्षण पूर्ण केले. तत्त्वज्ञान विषयातून पदवी घेतली आणि काही काळ मुलांना शिकवण्याचे कामही केले. एक सामान्य माणूस जे दैनंदिन काम करतो, ती कामे लक्ष्मी आत्मविश्वासाने पार पाडतात. आज त्या विशेषत दिव्यांग मुलांसाठी काम करत असून त्यांना आत्मनिर्भर आणि सन्मानाने जगण्याची दिशा देत आहेत.
लक्ष्मीच्या आयुष्यातील संघर्ष निरंतन राहिला आहे. लहान वयातच वडिलांचे निधन झाले. त्या घटनेने त्या हादरल्या, पण खचल्या नाहीत. अपंगत्व असूनही शिक्षण सुरू ठेवण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतला. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांच्या या परिस्थितीत सरकारकडून त्यांना कोणतीही विशेष सुविधा मिळाली नाही. ना सरकारी नोकरी, ना कोणत्याही योजनांचा लाभ. तरीही लक्ष्मीने स्वतवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही. आज त्या एका दिव्यांगांसाठी काम करणार्या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहेत आणि मुलांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पेरत आहेत.
‘आयुष्याबद्दल काही तक्रार नाही का?‘ असा प्रश्न विचारला असता, लक्ष्मीने शांत, हसर्या चेहर्याने उत्तर दिले की, नाही, मला कोणतीही तक्रार नाही. त्यांचे आयुष्य नक्कीच सोपे नाही. अडचणी, वेदना आणि अपमानाचे क्षण त्यांनाही आले. पण त्या दुःखात अडकून राहिल्या नाहीत. रडण्याऐवजी पुढे जाणे त्यांनी निवडले. यामुळेच आज त्या प्रेरणादायी बनून समाजापुढे आदर्श निर्माण करू शकल्या.



























































