अण्णा आता तरी उठा…!

काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखविले. त्यानंतर देशातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. या सर्व घडामोडीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे फ्लेक्स पुण्यातील पाषाण रस्त्यावर झळकले आहेत.

अण्णा आता तरी उठा. कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा… होय मतांची चोरी आहे. देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुपूमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना, अण्णा तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? असा सवाल या फ्लेक्सच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.

90 वर्षांनंतरही मी हेच करावे!

या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत तरुणांना खडसावले. ते म्हणाले, मी दहा कायदे आणले; पण 90 वर्षांनंतरही मीच करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे. देशाचे नागरिक म्हणून तुमचेही काही कर्तव्य आहे की नाही? नुसता तिरंगा हातात घेऊन, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठय़ा आशेने तरुणाकडे पाहतोय, कारण युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. जर ही जागी झाली तर देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. मात्र, एवढी वर्षे लढून कायदे करून झाल्यानंतरही ‘अण्णांनी जागे झाले पाहिजे’ असे म्हणणे वाईट वाटते.