बिडवलकर खून प्रकरणात आणखी एका संशयित आरोपीला अटक

कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सहावा संशयित गौरव वराडकर (सातार्डा, ता. सावंतवाडी) याने प्रकाशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींना मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या संशयिताला अटक करून शनिवारी कुडाळ न्यायालयात हजर केले. तसेच याच गुह्यातील गणेश नार्वेकर वगळता अन्य चार संशयितांना पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व पाचही संशयित आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सिद्धेश शिरसाट, अमोल शिरसाट, सर्वेश केरकर, गणेश नार्वेकर व अनिकेत गावडे या पाचही जणांना पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी अबाधित राखून न्यायालयीन कोठडी दिली होती. पाचवा संशयित अनिकेत गावडेला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणातील सहावा संशयित आरोपी गौरव वराडकर याने प्रकाश बिडवलकरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींना मदत केली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी गौरव वराडकरला ताब्यात घेऊन अटक केली व शनिवारी कुडाळ न्यायालयात हजर केले. तसेच या प्रकरणातील अन्य पाच संशयित आरोपींपैकी गणेश नार्वेकर वगळता अन्य सिद्धेश शिरसाट, अमोल शिरसाट, सर्वेश केरकर व अनिकेत गावडे या चार जणांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले.

यावेळी तपासी अधिकारी कांबळे यांनी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश शिरसाट आणि मयत प्रकाश बिडवलकर या दोघांचे मोबाईल हस्तगत करावयाचे आहेत तसेच या प्रकरणात अन्य दोन गाड्या वापरण्यात आलेल्या आहेत. त्या दोन्ही गाड्या आम्हाला ताब्यात घ्यावयाच्या आहेत. त्यामुळे संशयित आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.

यावेळी न्यायालयाने संशयित पाचही आरोपींना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. विवेक मांडकुलकर व अ‍ॅड. संजीव प्रभू यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने पाटील यांनी युक्तिवाद केला.

खरा आका नीलेश राणेच, वैभव नाईक यांचा आरोप

बिडवलकर खून प्रकरणात सिद्धेश शिरसाटला पकडल्यानंतर नीलेश राणेंनी जिल्हा नियोजनाच्या सभेत पोलीस अधीक्षकांना दोन वर्षांपूर्वीची प्रकरणे आता कशी काढता, अशी विचारणा केली होती. जिह्यातील ड्रग्ज व अवैध धंदे पहिल्यांदा बंद करा, असे सांगत आक्रमक भूमिका घेतली होती. माझे फोटो कुठेच सापडले नाहीत, परंतु सिद्धेश शिरसाटसोबत नीलेश राणे यांचे असलेले फोटो त्यांच्याच ट्विटर अकाऊंटवर आहेत. त्यामुळे बिडवलकर खून प्रकरणातील खरा आका नीलेश राणेच आहेत असा घणाघाती आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.