
अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव येथील मिठू दत्त (वय 42) यांच्या मारहाणीतून झालेल्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात खून झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यावेळी तपास हाताळणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश दिले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यावर गुन्हा दडपल्याचे, आर्थिक तडजोड केल्याचे आणि जाणीवपूर्वक खुनाचा गुन्हा दाखल न केल्याचे आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 6 मार्च 2025 रोजी दत्त यांना मारहाण झाली. सुरुवातीला त्यांना नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर रात्री उशिरा ससून रुग्णालय, पुणे येथे हलविण्यात आले. 23 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, 29 मार्च 2025 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात केवळ ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली. पुढील तपास स्वतः एपीआय गीते यांनी घेतला; पण खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
साकत येथील सोमनाथ चितळकर यांनी या प्रकरणात पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत गंभीर आरोप केले. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमात वृत्त प्रसिद्ध होताच अधीक्षके घार्गे यांनी याची तत्काळ दखल घेत सुपा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे सखोल चौकशी सोपविली. गडकरी यांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या. मिठू दत्त यांचा मृत्यू हा अपघाती नसून, मारहाणीमुळे झालेला खून असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार भाऊसाहेब विश्वनाथ नांगरे, जावेद छोटू आतार, शिवशंकर रमेश माहतो यांच्यासह हॉटेलमधील इतर कामगारांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीपासून खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही? घटनेचे व्हिडीओ पुरावे असतानाही प्रकरण ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून का ठेवले? आरोपींशी आर्थिक तडजोड झाली का? तपासात जाणीवपूर्वक विलंब का करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
मात्र, गडकरी यांच्या तपासामुळे गीते यांच्या भूमिकेवर गंभीर संशय निर्माण झाला आहे. सध्या खातेनिहाय चौकशी सुरू असून, त्यानंतरचा अहवाल अधीक्षक घार्गे यांच्याकडे सादर होणार आहे. दोष सिद्ध झाल्यास कारवाईसाठी कठोर पावले उचलली जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.
रूईछत्तीशीतील प्रकरणही तापले
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूईछत्तीशी येथे वेश्या व्यवसायाविरोधात ग्रामस्थांनी उपोषण केले होते. पोलिसांच्या आशीर्वादानेच हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी छापे पडलेल्या दोन हॉटेल्ससह आणखी दोन हॉटेल्स कायमस्वरूपी सील करण्यासाठी अधीक्षक घार्गे यांच्या आदेशाने प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. काही दिवसांत कारवाई अपेक्षित आहे. गावात अवैध धंदा चालू न देण्यासाठी पोलिसांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
























































