
एक काळ असा होता जेव्हा आयफोन हिंदुस्थानला आपले मार्केट मानत नव्हती. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. अॅपलने 2024 या वर्षात हिंदुस्थानात आयफोन विक्रीचा रेकॉर्ड केलाय. एका वर्षात अॅपलने हिंदुस्थानात 10 अब्ज डॉलरचे आयफोन विकले. स्मार्टफोनच्या दुनियेत राज्य करणारी सॅमसंग कंपनी दुसऱ्या स्थानावर घसरली. मार्केट रिसर्चर ‘आयडीसी इंडिया’च्या आकडेवारीनुसार अॅपलने सलग दुसऱ्यांदा हिंदुस्थानात स्मार्टफोन विक्रीमध्ये सॅमसंगला मागे टाकलंय. हिंदुस्थानातील आयफोन विक्रीच्या मूल्यात गेल्या वर्षीपेक्षा 24 टक्के वाढ झाली.
आयडीसी इंडियाच्या अंदाजानुसार, जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान सॅमसंगच्या स्मार्टफोनची शिपमेंट 5.23 अब्ज डॉलर आहे, जी ऍपलच्या 7.96 अब्ज डॉलरच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या मार्केट व्हॅल्यू शेअरमध्ये खूप फरक दिसून येतोय.
कोणत्या मॉडेलला पसंती
अॅपलने हिंदुस्थानात सप्टेंबरच्या तिमाहीत 40 लाख आयफोन विकले. त्यामध्ये दोन मॉडेलची विक्री सर्वाधिक झाली. आयफोन 15 आणि आयफोन 13. 2024 मध्ये 12 दशलक्षपेक्षा अधिक आयफोन विक्रीचे अॅपलचे लक्ष्य आहे. हिंदुस्थानात अॅपलच्या जुन्या आयफोन मॉडेलची विक्री झाली. कारण दिवाळी व अन्य खास दिवसांचे औचित्य साधून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून सवलत देण्यात आली होती. अॅपलच्या दमदार कामगिरीमुळे मार्केटमध्ये 30 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोनचा हिस्सा वाढण्याची शक्यता आहे.