291 आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या 291 आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा परिषदांच्या अंतर्गत महिला आरोग्य सेवकांची पदे ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित संचालक, आरोग्य सेवा संचालनालयामार्फत शासकीय परिचर्या महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांमधून 2 वर्षांच्या कालावधीसाठी भरण्यात येत असत. हा कालावधी संपल्यानंतर या उमेदवारांना कार्यमुक्त केले जात असे. त्यानंतर संबंधित जिह्यातील रुग्णसेवेची निकड आणि जिह्यातील रिक्त पदांची स्थिती लक्षात घेता त्यांना 11 महिन्यांची अस्थायी नियुक्ती देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना होते. विभागीय आयुक्तांचा हा अधिकार सन 2018 मध्ये रद्द करण्यात आला होता.

अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी धाराशीवमध्ये जागा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशीव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. धाराशीव नगरपरिषदेकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी जमीन मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार धाराशीव शहरातील सर्व्हे क्र.426 येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जमीन विनामूल्य देण्यात आली आहे.