मुंबईपासून दूर… उन्हाळी सुट्टीच्या ‘त्या’ जगात! एप्रिल मे 99! इंटरनेट आणि स्मार्टफोनच्याही आधी…

इंटरनेट नव्हतं, स्मार्टफोन नव्हता तेव्हाचं जगच भन्नाट होतं. उन्हाळी सुट्टी म्हटलं की मुंबईला रामराम आणि गावची वाट ठरलेली होती. मुंबईच्या कोलाहलापासून दोन महिने एका वेगळय़ाच जगात घेऊन जात होते. ‘99’च्या आधीचं हेच हरवलेलं जग पुन्हा गवसलं आहे. यंदाच्या सुट्टीत या जगाची मनमुराद भ्रमंती करण्याचा आनंद मराठी प्रेक्षकांना घेता येणार आहे तो ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटातून…

‘एप्रिल मे 99’ ही उन्हाळय़ाच्या सुट्टीची नॉस्टॅलजिक सफर आहे. ही माझी गोष्ट आहे, तुम्हा -आम्हा प्रत्येकाची आहे, असे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रोहन मापुस्कर सांगतात. बॉलीवूडमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून स्वतःची छाप उमटवणारे रोहन मापुस्कर यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलंय. हा चित्रपट 16 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

सुट्टय़ांचा सुवर्णकाळ…

प्रसाद, कृष्णा, सिद्धेश आणि जाई… या चार मुलांभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. उन्हाळी सुट्टय़ांचा सुवर्णकाळ या चित्रपटात उभा केला गेला आहे. ‘मस्तीची आलीया लाट, सुट्टीची झाली सुरुवात…’ या ओळींप्रमाणेच हा चित्रपट धम्माल मनोरंजन घेऊन येत आहे. आजी-आजोबा, आई-बाबा आणि मुलं अशा सगळय़ांसाठीच हे ‘समर स्पेशल गिफ्ट’ आहे. ‘मला नाय जायचंय मुंबईला, तू बोल ना गं पप्पांशी…’ असा आईकडे केलेल्या हट्टात या कथेचं सगळं सार आहे.

आपल्या सर्वांचा एप्रिल-मे ‘डिजिटल’ होईपर्यंतचा प्रवास सारखाच होता. इंटरनेट, स्मार्टफोन आल्यानंतर तो बदलला. मोबाईल नव्हता तेव्हा आपण सुट्टय़ा खऱया अर्थाने एन्जॉय करायचो. त्या आठवणीतील गोष्टींची ही कथा आहे. – रोहन मापुस्कर

मे महिन्यात 17 मराठी सिनेमे!

मराठी चित्रपटांसाठी मे महिना विक्रमी ठरणार आहे. या महिन्यात तब्बल 17 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘आता थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. या आठवडय़ात ‘पीएसआय अर्जुन’, ‘माझी प्रारतना’, ‘26 नोव्हेंबर’ तर पुढच्या आठवडय़ात ‘एप्रिल, मे 99’, ‘बंजारा’, ‘अमायरा’, ‘खवीस’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शेवटच्या आठवडय़ात सहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.