जवानांना इन्स्टावर पोस्ट करता येणार नाही! लष्कराकडून सोशल मीडिया नियमावली जारी

हिंदुस्थानात सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मात्र, याचबरोबर काही धोके सुद्धा निर्माण झाले आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून याच धोक्यांना केंद्रित करत हिंदुस्थानी लष्कराने जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार आता जवनांना आणि अधिकाऱ्यांना इन्स्टाग्राम वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी कडक नियम सुद्धा जारी केले आहेत.

लष्कराने जारी केलेल्या नियमांनुसार, जवान आणि अधिकारी इन्स्टाग्रावर पोस्ट, व्हिडीओ पाहू शकतात, त्यावर लक्ष ठेऊ शकतात. मात्र, हे सर्व करत असताना जवानांना किंवा अधिकाऱ्यांना कोणत्याही पोस्टवर लाईक करण्याचा, कमेंट करण्याचा आणि कोणालाही मेसेज करण्याचा अधिकार नाहीये. तसेच त्यांना स्वत:ची पोस्ट किंवा व्हिडीओ इन्स्टाग्रावर टाकण्यास सुद्धा परवानगी नाहीये. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. जवनांना आताच्या डिजिटल जगाशी जुळवून घेता यावं आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या फसव्या आणि देशविरोधी हालचालींवर लक्ष ठेवता यावं, हा लष्कराच्या या नियमावली मागचा उद्देश आहे.

इन्स्टाग्राम व्यतिरिक्त युट्यूब, एक्स, कोरा सारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर केवेळ माहिती मिळवण्यासाठी करण्यात यावा, त्यावर कोणत्याही प्रकारची पोस्ट किंवा व्हिडीओ अपलोड करू नये, असे आदेश लष्कराने दिले आहेत. तसेच स्काईप, व्हॉट्सॅप, टेलिग्राम आणि सिग्नल या अॅप्सचा वापर सामान्य स्वरुपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याचा वापर करत असताना केवळ ओळखीच्या लोकांनाच मेसेज, पोस्ट किंवा व्हिडीओ सेंड करण्यास परवानगी असेल. तसेच लिंक्डइनचा वापर सुद्धा फक्त माहिती मिळवण्यासाठी आणि रेज्यूमे अपलोड करण्यासाठी केला जाऊ शकतो.