वेब न्यूज – श्रद्धा, अंधश्रद्धा आणि संकट

गेल्या नऊ दिवसांत मेक्सिको देशामध्ये दोन प्राचीन पिरॅमिड्सचा काही भाग लागोपाठ कोसळला आणि तिथल्या स्थानिक जमातीमध्ये एकच घबराट पसरली आहे. पिरॅमिड्सचे असे कोसळणे हा अत्यंत अशुभ संकेत असून जगावर फार मोठे संकट कोसळणार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला आहे. आधी उटाहच्या ग्लेन पॅनियन नॅशनल रिक्रिएशन एरियामध्ये असलेल्या पिरॅमिडचा काही भाग कोसळला आणि त्यानंतर इहुआत्झियो या पुरातन विभागातील पिरॅमिडचा काही भाग कोसळला. मेक्सिकोच्या पुरातत्त्व खात्याने यामागे नैसर्गिक कारण असल्याचे सांगितले आहे. या प्राचीन पिरॅमिडला काही ठिकाणी भेगा पडलेल्या होत्या आणि त्यातून मुसळधार पावसाचे पाणी आत शिरल्याने काही भाग ढासळला.

स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या येथे असलेल्या पुरेपेचा जमातीच्या वंशजांनी या वास्तू उभारल्या होत्या. या वास्तूंचा उपयोग हे लोक नरबळी देण्यासाठी करत असत. पुरेपेचा ही प्रखर लढवय्यी जमात मानली जाते. या भागात पूर्वी वास्तव्यास असलेल्या अॅझटेक या जमातीचा त्यांनी पराभव केला आणि या भागावर आपले साम्राज्य स्थापन केले. या पुरेपेचा जमातीमध्ये कुरिकावेरी देवतेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी याकाटा नावाचे एक पिरॅमिड उभे करण्यात आले होते. या जमातीने या भागावर 400 वर्षे राज्य केले. त्यानंतर इथे स्पॅनिश आक्रमण झाले आणि त्यांची सत्ता संपुष्टात आली.

पुरेपेचा जमातीचे काही स्थानिक लोक सांगतात की, त्यांच्या इतिहासाप्रमाणे पिरॅमिड कोसळणे हा देवतेचा शाप मानला जातो. पूर्वी एकदा पिरॅमिडचा असाच काही भाग कोसळला होता आणि त्या वेळी त्यांच्या टोळीवर प्रचंड मोठा हल्ला झाला होता. या वेळी घडलेली घटना हीदेखील येणाया आपत्तीचा एक संदेश आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. वरची घटना आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया बघता माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱयात असला तरी श्रद्धा-अंधश्रद्धा त्याची पाठ सोडत नाहीत हेच खरे.