आभाळमाया – ‘थिअरी’चा काळ!

>> वैश्विक, [email protected]

पावसाळा म्हणजे आकाशदर्शनाचा आनंद ढगाआड जाणे. अर्थातच अवकाशातल्या पृथ्वी नावाच्या ग्रहाच्या फुलन-फलनासाठी पावसाचे हे चार महिने आवश्यकच. आकाशातून भरपूर पाणी पडेल. शेतं बहरतील, नद्या नाले, विहिरी भरतील तेव्हाच तर जनजीवनाला अन्नधान्य मिळेल आणि रोजच्या उपजीविकेची सोय झाली तरच कला-विज्ञानाचा विचार निवांतपणे होईल.

त्यामुळे पावसाळ्याच्या काळात आम्ही खगोल-मंडळी प्रतिवर्षीप्रमाणे थोडा ‘थिअरी’चा अभ्यास करत असतो. नामवंत संशोधकांनी व्याख्यानं ऐकतो. चर्चा करतो. नुकतेच डॉ. आशुतोष कोतवाल या अमेरिकास्थित संशोधकाचं ‘हिग्ज बॉसॉन प्रकल्प’ आणि ‘डब्ल्यू बॉसॉन’ मूलकणासंबंधीचं सर्वसामान्यांनाही समजेल असं व्याख्यान ऐकलं. त्याच वेळी आमची अभ्यासकांची चर्चा आणि ‘खगोल-विश्व’ या नियतकालिकाचे विषय ठरविण्याची तयारी सुरू होती. मध्यंतरी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांच्या दुःखद निधनाची वार्ता आली आणि सारेच हळहळले. त्यांच्यासोबत झालेल्या अनेक भेटी आणि संवादांच्या आठवणी जाग्या झाल्या. आयुष्यभर विश्वरचनेचा धांडोळा देण्याचा ध्यास घेतलेली अशी माणसं आपल्या विश्वाची जाणीव करून देत असतात. नारळीकर तर ती सोप्या शब्दांत करून देत.

विश्वातील अनेक कोडी आणि प्रमेय मांडायला प्रखर बुद्धिमत्ता हवी आणि सर्वसाधारण समाजाला त्यामागचं गमक समजेल अशा पद्धतीने ते कथा किंवा कांदबरीस्वरूपात उतरवण्यासाठी तेवढी प्रतिभाही हवी. प्रा. नारळीकर यांच्या अनेक विज्ञानकथांनी, विश्वरचनेविषयी अपार कुतूहल निर्माण केलं. अगदी लहान मुलांना, विद्यार्थ्यांना कळेल अशा भाषेतही ते संवाद साधत.

विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांनी असं सामाजिक संवादकाचंही काम अधूनमधून केलं तर अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते. मात्र त्यामागचा कार्यकारणभाव अलगदपणे उलगडून सांगावा लागतो. तोसुद्धा सोप्या शब्दात. प्रा. नारळीकर आणि अनेक संशोधक असं काम करत असतात. परदेशात तर अवकाश विज्ञान कथांना खूप मागणी असते. कार्ल सेगन, आर्थर सी. क्लार्क, आयझॅक ऑसिमॉव्ह यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेल्या विज्ञानकथा त्याच भाषेत किंवा भाषांतर उपलब्ध असल्यास जरूर वाचाव्या. वाचनाची, लेखनाची, ललित वाङ्मयाची आवड वाचणाऱ्यांना असतेच, पण आपल्याकडे गेल्या दीड-दोनशे वर्षात वेगाने जग व्यापणाऱ्या विज्ञानाचं प्रतिबिंब फार कमी वेळा आढळतं. तरीसुद्धा मराठीत अनेक विज्ञानकथा लेखकांनी केलेलं विपुल लेखन आपल्या वाचनात आलं तर विज्ञान मनोरंजक पद्धतीने समजेल.

आपण सारेच काळाच्या ओघात नकळतपणे विज्ञानाचा भरपूर वापर करतो. नव्हे ते कौतुकाने मिरवतोसुद्धा. अत्याधुनिक सेलफोन, कार यांचा  वापर आणि चर्चा चालतेच. मात्र त्यामागचे ‘इंगित’ शोधण्याची उत्सुकता अभावानेच दाखवली जाते. त्यासाठी अगदी बारकावे समजून घ्यायची गरज नसते, परंतु त्यामागील किमान तत्त्व जाणून घेता येते. पुढील पिढ्यांशी संवाद साधण्यासाठीही ते उपयुक्त ठरते. कारण सतत बदलत्या जेन झी, जेन अल्फा वगैरे ‘पिढ्या’चं जग वैज्ञानिक प्रगतीबरोबर धावणारं आहे. ते किमान कसं आहे इतकं तरी समजायला विज्ञानाच्या अनेक शाखांची माहिती उपयुक्त ठरते. ‘चॅटजीपीटी’ वगैरेचा वापर न करणाऱ्यांनाही त्याविषयी थोडीतरी माहिती हवी. पत्रकारितेनेही याकडे लक्ष पुरवायला हवं.

मराठी वृत्तपत्रांचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा काळ एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धाचा. म्हणजे 1812 ते 1846 असा अवघ्या 35-36 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सात-आठ भाषांचा अभ्यास केला. ‘दर्पण’ नावाचं पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केले. प्राध्यापक म्हणून काम केले आणि त्याचबरोबर समाजसुधारकाची भूमिका घेत खगोल विज्ञानाचाही अभ्यास केला. आपल्याकडे राशी आणि नक्षत्रांची नाव परंपरेने होतीच, परंतु नंतर ज्या तारकासमूहांची नोंद ‘मेसित’ या फ्रेंच संशोधकाने केली त्याना योग्य संस्कृत नावं देण्याची ऐतिहासिक कामगिरीही केली. याची उदाहरणं म्हणजे ‘अॅन्ड्रोमीडा’ या आपल्या ‘मिल्की वे’ दीर्घिकेला सर्वात जवळच्या (22 लाख प्रकाशवर्षे) दीर्घिकेला त्यांनी ‘देवयानी’ तर आपल्या दीर्घिकेला ‘आकाशगंगा’ म्हटलं. एवढंच नव्हे तर या 8 तारकासमूहांपैकी बरीच प्रतिनामं दिली. त्यात पर्सिअस म्हणजे ययाती, पॅसिओपिआ म्हणजे शर्मिष्ठा, पेगॅसस म्हणजे महाश्व, हायड्रा म्हणजे वासुकी, ऑफियुक्स म्हणजे भुजंगधारी अशी नावं देऊन त्यांनी हे तारकासमूह आपल्याला ‘परिचित’ वाटावे यासाठी कल्पकता दाखवली.

विज्ञान हे मनोरंजनातून समजलं तर ते मनात नकळत रुजतं. म्हणूनच एकदा अवकाशातील ‘प्राणीसंग्रहालय’ जाणून घेऊ या. म्हणजे नोव्हेंबरनंतर ते दुर्बिणीतून पाहता येईल.