
>>वैश्विक, [email protected]
सूर्यमालेतला प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने कधी तो सूर्याजवळ येतो तर कधी सूर्यापासून दूर जातो. त्या ग्रहाची कक्षा स्वतःच्या अक्षाशी किती कलली आहे त्यावर आणि त्याच्या सूर्यापासूनच्या अंतरावर तिथे कधी उन्हाळा आणि थंडी असणार ते ठरते. पावसाळा हा आपल्याकडे उन्हाळ्यात उपऋतू आहे तो हिंदुस्थानातच 4 महिने ’वस्तीला’ राहात असल्याने एक संपूर्ण ऋतू ठरला आहे.
आज आपण वाचणार आहोत ते सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या अंतरात सूर्यसापेक्ष किती बदल होतात त्यासंबंधी. लेखाच्या शीर्षकात उपसूर्य आणि अपसूर्य शब्द वापरलेत. ती सूर्याची विशेषण नव्हेत, तर ग्रहांची सूर्याच्या जवळ आणि दूर जाणारी स्थिती सांगणाऱ्या संज्ञा आहेत. यातील ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘अप’ म्हणजे लांब. सूर्याभोवती फिरणाऱ्या सर्वच ग्रहांच्या कक्षा लंबवर्तुळाकार आहेत, जेव्हा हे ग्रह सूर्याजवळ येतात तेव्हा वेगाने फिरतात आणि दूर असताना त्यांचा वेग मंदावतो. परंतु केपलर यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार दोन्ही वेळा समान क्षेत्रफळ पार करतात.
सूर्यापासूनचा पहिला ग्रह बुध. तो त्याच्या कक्षेत सूर्याच्या जवळ असतो तेव्हा ते अंतर 4 कोटी 60 लाख किलोमीटर असते, तर तो दूर जातो तेव्हा ते 6 कोटी 98लाख किलोमीटर एवढे होते. शुक्र ग्रह हा सूर्यापासून दुसरा – तो सूर्यसान्निध्य असतो तेव्हा त्याचे सूर्यापासूनचे अंतर 10 कोटी 74 लाख किलोमीटर असते आणि लांब जातो तेव्हा 10 कोटी 89 लाख किलोमीटर होते.
सौरमालेतला तिसरा ग्रह म्हणजे अर्थातच अवकाशातून निळीशार दिसणारी आपली पृथ्वी किंवा ’ब्लू प्लॅनेट. पृथ्वी सूर्यापासून जवळ असताना 14 कोटी 71 लाख किलोमीटरवरून फिरते आणि आपल्या लंबवर्तुळाकार कक्षेत दूरवर गेली की सूर्य-पृथ्वी अंतर 15 कोटी 21 लाख किलोमीटर होते. म्हणूनच पृथ्वी सूर्यापासून सरासरी 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे असं आपण म्हणतो. हेच अंतर खगोलीय एकक किंवा ‘अॅस्ट्रॉनॉमिकल युनिट’ मानलं जातं.
बुध, शुक्र हे पृथ्वीच्या दृष्टीने अंतर्ग्रह, कारण त्यांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आतल्या बाजूला आहेत. याचाच परिणाम म्हणून हे दोनच ग्रह काही वेळा आपल्याला सूर्यबिंबापुढून काळ्या ठिपक्यासारखे सरकताना दिसतात. त्यालाच या ग्रहांचे अधिक्रमण किंवा ‘ट्रान्झिट’ म्हटले जाते. बुधाचे ‘अधिक्रमण’ फारसे प्रेक्षणीय नसते, परंतु मध्ये शुक्राचे सुंदर अधिक्रमण दोन वेळा पाहायला मिळाले आणि आमच्या खगोल मंडळाने ते हजारो लोकांना दुर्बिणीतून दाखवले.
पृथ्वीपलीकडचा पहिला आणि जिथे जाऊन वस्ती करण्याची स्वप्ने माणूस पाहतोय तो लाल रंगाचा मंगळ ग्रह, त्याच्या कक्षेत फिरत असताना जेव्हा सूर्याच्या नजीक येतो त्यावेळी त्याचे सूर्यापासूनचे अंतर 20 कोटी 66 लाख किलोमीटर आणि दूर जातो तेव्हा 24 कोटी 92 लाख किलोमीटर होत असते. मंगळानंतरचा नावाप्रमाणेच ’मोठा’ असलेला म्हणजे पृथ्वीच्या 11 व्यास असणारा ग्रह गुरू. त्याच्या दक्षिण गोलार्धातील वादळच पृथ्वीपेक्षा मोठे आहे. तोसुद्धा सूर्याभोवतीच फिरताना जवळच्या कक्षेत 74 कोटी 74 लाख किलोमीटरवर आणि सूर्यापासून लांब गेल्यावर 81 कोटी 60 लाख किलोमीटर अंतरावरून सूर्याची परिक्रमा करतो. गुरूपासून पुढचे ग्रह वायुरूप (गॅशिअस) आहेत.
शनी हा त्याच्या मनोहारी ‘कडय़ा’मुळे नटलेला ग्रह दुर्बिणीतून फारच छान दिसतो. त्याच्या त्या ‘रिंग्ज’ आणि टायटनसारख्या मोठा उपग्रहांसह तो सूर्याजवळच्या कक्षेत 1 अब्ज 35 कोटी किलोमीटर अंतरावर येतो आणि तो लांब जातो तेव्हा सूर्य-शनी अंतर 1 अब्ज 50 कोटी 39 किलोमीटर असते.
युरेनस ग्रहाचा अक्ष 90 अंशांनी कललेला आहे. (पृथ्वीचा 23.5 अंशांनी) त्यामुळे तो सूर्याभोवती गडगडत गेल्यासारखा फिरतो. सूर्यसान्निध असताना तो 2 अब्ज 73 कोटी 48 लाख, तर लांब गेल्यावर 3 अब्ज 4 लाख किलोमीटर अंतरावर फिरत राहतो.
शेवटचा नेपच्यून ग्रह सूर्याजवळ येतो तेव्हा 4 अब्ज 54 कोटी किलोमीटर आणि दूर गेला की 4 अब्ज 54 कोटी 57 लाख किलोमीटरवरून सूर्याची प्रदक्षिणा करतो. प्लूटो आता खुजा ग्रह झाल्याने तो या ग्रहांमधे येत नसला तरी तोसुद्धा त्यापलीकडच्या ‘कीपर’ अशनी पट्टय़ासह सूर्याभोवततीच लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो.
एवढे प्रचंड ग्रह एवढय़ा प्रचंड अंतरावरून सूर्याच्या असे ‘अंकित’ कसे राहतात याचं उत्तर म्हणजे या सर्व ग्रहांचे एकत्रित वस्तुमान, सूर्याच्या वस्तुमानाच्या तुलनेत फक्त 2 टक्के आहे.
टीप : दि. 16 ते 18 नोव्हेंबर या काळात मध्यरात्री सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव निरभ्र काळोख्या जागी जाऊन जरूर पहा.




























































